महापूराचे‌ पाणी जत तालुक्यात सोडावे ; संजय कांबळे

0



जत,संकेत टाइम्स : कृष्णा, कोयना नद्यांना पावसाळ्यात आलेले महापुराचे पाणी दुष्काळी भागात कॅनाॅलव्दारे सोडून जत,कवठेमहांकाळ,तासगाव या  तालुक्यातील सर्वच साठवण तलाव भरून घ्यावेत,अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. 






कांबळे म्हणाले की,आम्ही यापूर्वीही पावसाळ्यात महापुरात अतिरिक्त झालेले कृष्णा, कोयना, वारणा,या नद्यांचे पाणी दुष्काळी तालुक्यात सोडणेबाबत शासनाकडे मागणी केली होती.परंतु शासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

सद्या कृष्णा, कोयना,वारणा या नद्या दुधडीभरून वाहत आहेत.या नद्या केंव्हा धोक्याची पातळी ओलांडतील हे सांगता येत नाही.महाराष्ट्रातील मोठे असलेले कोयना धरण जवळ जवळ भरत आले आहे.या धरणातून अतिरिक्त झालेले पाणी नदीपात्रात सोडावेच लागणार आहे.त्यामुळे नद्यांतील पाण्याच्या पातळीत आणखीन मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. 

Rate Card

जलसंपदा मंत्री म्हणून आपण आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडत आहात.तरीही या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठावरील शेती,पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून दरवर्षी महापुराला नदीकाठच्या लोकांना सामोरे जावे लागत आहे. 





यासाठी आपण पावसाळ्याच्या दिवसात नदीपात्रातील धरणातून सोडण्यात आलेले अतिरिक्त पाणी तसेच नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पडणारे जादा पाणी नद्यांना मिळून मोठ्या प्रमाणात नदीकाठच्या गावांना नैसर्गिक आपत्तीना सामोरे जावे लागत आहे. नदीकाठच्या गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.तरी आपण आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून हे पावसाळ्याच्या दिवसात नदीपात्रातील वाया जाणारे अतिरिक्त पाणी तासगाव, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यात कॅनाॅलव्दारे सोडून या पाण्यातून दुष्काळी तालुक्यातील सर्वच साठवण तलाव भरून घेतली तर दुष्काळी तालुक्याला न्याय दिल्यासारखे होईल व पावसाळ्यात नद्यांना महापूर येऊन अतिरिक्त होणारे पाण्यामुळे होणारे नदीकाठावरील गावातील नुकसान ही कमी होईल. तरी आपण याचा सहानुभूतीने विचार करावा व दुष्काळी तालुक्याला पाणी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ही कांबळे यांनी केली आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.