जत : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अर्थवाहिनी असलेली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही निवडणूक राज्यातील महाविकास आघाडी प्रमाणे आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,आणि शिवसेना एकत्र आलो आहोत. तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत उर्वरित जागांसाठी निवडणूक होत आहे.
जत तालुक्यात राष्ट्रवादीच्या एका नेत्याने बंडखोरी करत भाजपामधून उमेदवारी दाखल केली आहे,आम्ही अशी पक्षविरोधी भूमिका खपवून घेणार नाही.
जतमधून आ.विक्रमसिंह सावंत व इतर मागास गटातील मन्सूर खतीब यांनाच महाविकास आघाडीचे मतदार मोठ्या फरकाने विजयी करतील,असे उद्गार पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांनी काढले. जिल्हा बँकेच्या सहकार विकास पॅनल चा प्रचार शुभारंभ जत येथे करण्यात आला.यावेळी ना.जयंतराव पाटील बोलत होते.
यावेळी कृषी,सहकार राज्यमंत्री ना.विश्वजीत कदम,आमदार अनिल बाबर,आमदार विक्रमसिंह सावंत,अरुण लाड ,जयश्री पाटील ,किरण लाड पृथ्वीराज पाटील,रमेश पाटील,बाबासाहेब कोडग,महादेव पाटील कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी,उमेदवार उपस्थित होते.सूत्रसंचालन व स्वागत काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे यांनी केले.
ना.जयंतराव पाटील पुढे म्हणाले,आज राज्यात काही मोजक्याच जिल्हा बँका सक्षमपणे चालू आहेत, यात सांगलीच्या बँकेचा नंबर लागतो खऱ्या अर्थाने ही बँक शेतकऱ्यांसाठी काम करते आहे. राज्यातील एक मजबूत आणि शेतकऱ्यांचे हित जोपासणारी ही बँक आहे. हे करत असताना बँकेने गेली सात वर्षे ऑडिट वर्ग अ ठेवला आहे. हे सारं केवळ चांगली माणसं बँक हाताळत असल्याने शक्य झाले आहे.
ना. विश्वजीत कदम म्हणाले, काँग्रेसने नेहमी एकदा ठरले की धोरण बदलायचे नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेही ती भूमिका तंतोतंत पाळली पाहीजे. ही निवडणूक गाफीलपणे लढवून चालणार नाही. राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे आहे. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे यात काही गडबड झाली तर आम्ही दोघेही ती खपवून घेणार नाही असा इशारा मंत्री कदम यांनी दिला.
आमदार सांवत म्हणाले,बँकेसाठी आपण एकसंघ लढत आहोत,आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळतो आहोत,इतरांनी तो पाळावा.पालकमंत्री पाटील साहेबांनी तिन्ही पक्षातील नेत्यांना एकत्रित काम करण्याचे निर्देश द्यावेत,असे आवाहनही आ.सावंत यांनी यावेळी केले.