मुंबई : राज्यात वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या आणि ओमायक्रोनचे वाढते रुग्ण या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोलावलेल्या कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीत या सर्व बाबींचा आढावा घेतला.टास्क फोर्सने केलेल्या सूचनांनुसार गर्दी रोखण्यासाठी निर्बंध लावण्यात येणार असून नाताळ आणि थर्टी फर्स्टच्या गर्दीवर नियंत्रण आणणारी नवी नियमावली उद्या शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे.
ओमायक्रोनचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना काही सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रतही मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गर्दी राखण्यासाठी गृह विभागाकडून न्यू इयर पाटर्य़ांवर काही निर्बंध लादले आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत या सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली. नागरिकांमध्ये आलेला बेसावधपणा, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, ओमयक्रोनचा धोका या सर्व बाबींवर चर्चा केल्यानंतर निर्बंध लागू करण्यावर टास्क फोर्सकडून सूचना करण्यात आल्या. या बैठकीला मुख्य संचिव देवशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, आदी सहभागी होते.
आजपासून नवीन मार्गदर्शक सूचना
ओमयक्रोनचा धोका टाळण्यासाठी न्यू इयर पाटर्यांवरील निर्बंध अधिक कडक केले जाणार आहेत. या काळात रात्रीची गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू केली जाण्याची शक्यता आहे. दोन डोस घेतलेल्यानाच प्रवास तसेच अन्य बाबींच्या परवानगीबाबतही विचार करण्यात आला असून याची काटेकोरपणे अंमलबजावणी कशी करता येईल यादृष्टीने मार्गदर्शक सूचनांची आखणी करण्यात येत असून उद्या दुपारपर्यंत याविषयीचे आदेश काढण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले.
मुंबईत 48 तासांत कोरोना रुग्णसंख्या दुप्पट झाली
गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट झाला आहे. मंगळवारी 327 रुग्ण सापडले होते तर गुरुवारी 602 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील दिवसभरातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 1179 एवढी आहे.
ओमायक्रोनचा विळखा राज्यात दिवसभरात 23 रुग्ण सापडले
राज्यात ओमायक्रोन फैलावत असून गुरुवारी दिवसभरात तब्बल 23 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ओमायक्रोनबाधित रुग्णांची एकूण संख्या 88 झाली आहे. दिवसभरात मुंबईत 5, पुणे शहर 3, पुणे ग्रामीण 3, पिंपरी-चिंचवड 7, धाराशीव 2 आणि ठाणे, भाईंदर व नागपूरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण सापडला.