निवडणूक प्रक्रिया प्रत्येक वंचित घटकापर्यंत पोहचविण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करा : – अप्पर जिल्हाधिकारी डॉ.स्वाती देशमुख

0
1

सांगली : लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रियेला अनन्य साधारण महत्व आहे. निवडणुकीचा काळ हा लोकशाहीतील उत्सवाचा काळ असतो. निवडणूक प्रक्रियेमुळे योग्य उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र मतदाराला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे. निवडणूक प्रक्रिया प्रत्येक वंचित घटकापर्यंत पोहचविण्यासाठी निवडणुक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणुक अधिकारी  एम. बी. बोरकर, उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी अशिष बारकुळ, एस.एल.ओ. सचिन बरावकर, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल आदी उपस्थित होते.

निवडणुक प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून यासाठी सर्वच घटकांनी सहकार्य केले पाहिजे. मतदार नोंदणी पुर्नरिक्षण कार्यक्रम वर्षभर सुरु असतो. जे  वयाची 18 वर्षे पुर्ण करतील, अशा सर्व घटकातील व्यक्तींनी मतदारयादीत आपले नाव नोंदवून लोकशाहीचा भाग व्हावा, असे आवाहन करुन अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख म्हणाल्या, सुनो सबकी करो मनकी या म्हणीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. राष्ट्रीय निवडणूक आयोगाने यावर्षी सर्वसमावेशक सुलभ आणि सहभागपुर्ण निवडणुका हे घोषवाक्य निवडले आहे. त्यानूसार सर्वांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा. निवडणूक प्रक्रिया सुलभ पध्दतीने पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. त्यामुळेच सहभाग पुर्ण निवडणुका हे ब्रिद सत्यात उतरेल. निवडणुक कार्यालय सर्वच वंचित घटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करते. निवडणुक प्रक्रियेच्या सहभागात कोणीही वंचित राहू नये यासाठी कार्य करते. त्यासाठी जनतेनही आपला सहभाग द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उपजिल्हा निवडणुक अधिकारी एम. बी. बोरकर यावेळी म्हणाले, 25 जानेवारी हा निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस असून त्या निमित्ताने देशभरात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्त जिल्हास्तरावर विविध ठिकाणी मतदारयाद्या पुनर्निक्षण कार्यक्रमाने तसेच प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केला जातात. त्याचबरोबर जनजागृतीसाठी विविध उपक्रमही हाती घेण्यात येत असल्याचे सांगून जिल्हा निवडणुक कार्यालयामार्फत विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

जिल्हा निवडणुक कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांत सहभागी झालेल्या व स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीत अधिकारी धनंजय इंगळे, दिलीप गोसावी, धनराज ठोंबरे, कलीम नदाफ, उज्वला माळी, उत्कृष्ट पर्यवेक्षक अधिकारी संजय खताळ, तृत्तीय पंथी संस्था, मुस्कान संस्था सांगली, वेश्या व्यवसाय संस्था, वेश्या एडस्‍ मुकाबला परिषद सांगली.

282- सांगली विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील पुजा माने प्रथम क्रमांक, असिफा मुल्ला ‍ व्दितीय क्रमांक, वैष्णवी कुलकर्णी तृतीय क्रमांक यांना सन्मानित करण्यात आले. तर वक्तृत्व स्पर्धेतील शुभांगी पाटील प्रथम क्रमांक, सुप्रिया आवळे व्द‍ितीय क्रमांक यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी रतन भालेराव, ऋतुजा पाटील, प्रणव सूर्यवंशी, शर्वरी केळकर, सुशांत दबडे यांना ईपिक (मतदान ओळखपत्राचे) वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित सर्वांनी राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ घेतली

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here