दरवर्षी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीही हा दिवस जगभर उत्साहात साजरा केला जाणार आहे. चिमणी या चिमुकल्या पक्षासाठी व त्याचा संरक्षणासाठी हा दिवस साजरा केला जातो. झपाटयाने कमी होणारी चिमण्यांची संख्या लक्षात घेऊन २० मार्च जागतिक जागतिक दिवस म्हणून साजरा केला, तसेच येणाऱ्या पिढीला चिमणी हा पक्षी माहीत असावा या उद्देशाने हा दिवस चिमणी दिवस म्हणून घोषित करण्यात आला.
भारतात सर्वात जास्त माहीत असणारा पक्षी म्हणून चिमणी परिचयाची आहे. पूर्वी गल्लीबोळात, बाल्कनीत, गच्चीवर, झाडावर दिसणाऱ्या व मानवी वस्तीत मुक्त संचार करणाऱ्या चिमण्या आज दिसेनाशा झाल्या आहेत. अन्य पशुपक्ष्यांप्रमाणे चिमण्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. सहा महिन्यातून एकदा दोन चार अंडी घालणाऱ्या चिमण्यांना मिलन काळात मातीची गरज असते. पण मातीची जागा आता सिमेंटने घेतली आहे. सिमेंटच्या जंगलामुळे व वाढत्या वृक्षतोडीमुळे चिमण्यांचा अधिवास नष्ट झाला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विशेषतः शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन, आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता, अन्नाची उपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर यासारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाटयाने कमी होत आहे.
२० मार्च हा दिवस चिमण्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो. चिमण्यांची घटती संख्या अशीच कायम राहिली तर येणाऱ्या पिढीला चिमणी केवळ चित्रांमधूनच पाहता येईल. पक्षी हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे. सकाळी आपल्याला झोपेतून उठवणाऱ्या कोकिळेपासून चिमण्यांचा किलबिलाटापर्यंत सारे पक्षी आपला सारा दिवस आनंददायी जावा यासाठी आपल्या कानावर आणि मनावर नादमधुर संगीताचे स्वर उमटवीत असतात.
जसे हिरवेगार झाडे बघून मन प्रसन्न होते, तसेस पक्ष्यांमुळे मन आनंदी होते त्यासाठी पक्ष्यांचे अस्तित्व टिकवणे महत्वाचे त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या गच्चीत, बाल्कनीत, छपरावर कृत्रिम घरटी ठेवावीत. त्यात ज्वारी, बाजरी, गहू यासारखी धान्ये ठेवावीत. बाल्कनीत, गॅलरीत मातीच्या भांड्यात पाणी ठेवल्यास ते चिमण्यांना पिण्यास मिळेल व त्यांना उन्हाळ्याची झळही बसणार नाही. केवळ चिमणी दिवस साजरा करुन चिमण्या परत येणार नाहीत याचा विचार व्हावा.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५