जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात अनेक वर्षापासून रखडलेले महत्वाचे धार्मिक स्थळांना जोडणारे रस्त्यांना केंद्रस्तरावरून निधी मंजूर करून कामे करावीत,अशा मागणीचे निवेदन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांना जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे की,जत तालुका सर्वात मोठा तालुका असून कर्नाटक राज्यालगत आहे.सध्या बिजापूर (कर्नाटक) येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू असून वर्षभरात काम पूर्ण होणार आहे.जत तालुक्यातील गुड्डापुर हे धानम्मादेवीचे प्रसिद्ध देवस्थान असून रोज हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत चैत्र अमावसेला कर्नाटक,आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून जवळपास सात लाख भाविक यात्रेसाठी उपस्थित असतात.
सध्या कराड पासून लांडगेवाडी पर्यंत कॉक्रीट रस्ता पूर्ण झाला आहे व सांगोला (जिल्हा सोलापूर) येथून जत पर्यंत ही कॉक्रीट रस्ता पूर्ण झाला आहे.बेळगावहून अथणी मार्गे पंढरपूरला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग हा जत मार्गे आहे.जत तालुक्यातील गुड्डापूर,पंढरपूर,अथणी व बेळगाव अशा धार्मिक व मोठ्या स्थळांना जोडण्यासाठी लांडेवाडी जत चडचण रस्ता ९० किलोमीटर,जत बिळुर अथणी २६ किलोमीटर,वळसंग सोरडी गुड्डापूर संख तिकोंडी यतनाळ विजापूर रस्ता ३५ किलोमीटर या रस्त्यांना निधी देऊन सीमेंट कॉक्रीटचे रस्ते करावे.
हे रस्ते झाल्यास दोन्ही राज्यातील भाविक,व्यवसाय,ट्रान्सफोर्टसह शेती उत्पादन व दळणवळण सोयीचे होऊन जनतेचे जीवनमान उंचावणार आहे,त्यामुळे रस्त्यांना लवकरात लवकर मंजूरी द्यावी,असेही जमदाडे यांनी निवेदनात म्हटले आहे.