सांगली,संकेत टाइम्स : सिटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे तिसरे राज्यव्यापी अधिवेशन 7 व 8 मे रोजी वर्धा येथे संपन्न झाले. या अधिवेशनात 19 पदाधिकारी सर्वांच्या मंजुरीने व एक मताने निवडण्यात आले. तसेच 74 जणांची नवीन राज्य कार्यकारणी मंजूर करण्यात आली. राज्य कमिटीमध्ये सांगली जिल्ह्यातील तीन लढाऊ रणरागिनींचा समावेश केला असून सांगली जिल्ह्यातील कॉ.मिना कोळी यांची राज्य सचिव पदी निवड झाली तर राज्य कमिटी सदस्य म्हणून सुरेखा जाधव व सुवर्णा सणगर यांची वर्णी लागली आहे.या अधिवेशनात राज्य अध्यक्षपदी कॉम्रेड आनंदी अवघडे सातारा तर महासचिव म्हणून पुष्पा पाटील सोलापूर यांची निवड एकमताने करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातील लढाऊ महिला पुढारी कॉ.मिना कोळी कॉ.सुरेखा जाधव व सुवर्णा सणगर यांची राज्य कमिटीवर पदाधिकारी व सदस्य म्हणून निवड झाल्यामुळे त्यांचे जिल्हाभरातून अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिन्ही पदाधिकारी महिलांचा संयुक्त सत्कार सांगली जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती कॉ.उमेश देशमुख व कॉ हणमंत कोळी यांनी दिली.