मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ (पुणे) अंतर्गत शेळी, मेंढी विमा योजना राबविणार असल्याचे राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी मुंबईत सांगितले.
धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी नुकतीच केदार यांची भेट घेतली. शेळी, मेंढी महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबविणे, तसेच १ हजार कोटींची तरतूद करण्यासंदर्भातील मागण्या त्यांनी केल्या. काही दिवसांपुर्वी समाज कल्याण विभागाने त्यांच्या अखत्यारित् असलेल्या महात्मा फुले महामंडळ, अण्णा भाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास महामंडळ आदी संस्थांना १ हजार कोटींचे भागभांडवल दिले आहे.
त्याप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महामंडळाला १ हजार कोटींची तरतूद करावी, अशी भावना राज्यभरातील पशुपालकांची असल्याचे ढोणे यांनी सांगितले. महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजनेची व्याप्ती वाढवावी, अशीही मागणी त्यांनी केली. त्यावर पशुसंवर्धन मंत्री केदार यांनी विविध विषयांवर काम सुरू असल्याचे सांगितले. शेळी मेंढी विमा योजना आखली आहे.
त्या योजनेची अंमलबाजवणी लवकरच होईल. या योजनेमुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळेल, असे केदार म्हणाले. महामंडळाचे प्रत्येक क्षेत्र सक्षम करणार असल्याचे, तसेच त्याठिकाणी आधुनिक विकसीत केलेली (क्रॉस ब्रिड) शेळी उपलब्ध करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.