जत, संकेत टाइम्स : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या कृषी क्षेत्रातील विविध विभागात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना व कर्मचाऱ्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. 2018 -19 या वर्षात महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्रात सर्वोच्च समजला जाणारा ” उद्यान पंडित ” पुरस्कार सांगली जिल्ह्यातील अंतराळ येथील शेतकरी श्री काकासाहेब सावंत ता. जत यांना नाशिक येथे भव्य कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,कृषी मंत्री दादाजी भुसे,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,पालकमंत्री छगन भुजबळ,कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम कृषी आयुक्त धीरजकुमार उपस्थित होते.
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना कोरडवाहू फळपिकांच्या लागवडीतून शाश्वत उत्पादन मिळवणे, शेतकऱ्यांना शासकीय दरात दर्जेदार व खात्रीशीर कलमे उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, व शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यास मदत करणे हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून बनशंकरी नर्सरी परिवार काम करत आहे.आजूबाजूच्या परिसरातील लोक सातत्याने नर्सरी ला भेट देऊन तेथे होत असलेल्या विविध प्रयोगाची माहिती घेत आहेत.त्यामुळे दुष्काळी भागातील फलोत्पादन क्षेत्रात सावंत बंधू यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल राज्य शासनाने घेऊन त्यांना उद्यान पंडित या फलोत्पादन क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. अंतराळ आणि परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी सावंत बंधू यांनी महाराष्ट्र शासनाने आम्हाला दिलेल्या पुरस्कारामुळे आमचा आत्मविश्वास वाढला असून निश्चितपणे शेतकऱ्यांची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने केलेल्या सहकार्यामुळे विशेषत: तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक श्री विश्वास साबळे , श्री कांतप्पा खोत साहेब,श्री मनोज कुमार वेताळसाहेब, मंडल कृषी अधिकारी श्री जाधव साहेब ,श्री कदम साहेब, कृषी पर्यवेक्षक श्री कोळेकर साहेब, श्री कोकरे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले त्यामुळेच यशाचे सर्वोच्च शिखर प्राप्त करता आले असे आवर्जून सांगत शासनाच्या विविध योजना प्रामाणिकपणे राबविल्यास शेतकऱ्यांना यशस्वी होता येते हे दाखवून दिले आहे.
श्री बनशंकरी नर्सरीचे काकासाहेब सावंत यांचा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याहस्ते राज्यस्तरीय “उद्यान पंडित” पुरस्काराने गौरव करण्यात आला.