जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील उटगी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत जत पंचायत समितीचे माजी सभापती बसवराज बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित अंबिकादेवी शेतकरी विकास पॅनलने तेरापैकी बारा जागेवर विजय मिळवत दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. भाजपच्या विजयी बारा उमेदवारापैकी एक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. काँग्रेस प्रणित पॅनेलचा एक उमेदवार विजयी झाले. चुरशीने झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या गटाने सोसायटीवर दुसऱ्यांदा आपले वर्चस्व कायम ठेवले.
जत पूर्वभागातील प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या उटगी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत तेरापैकी बारा जागांवर विजय मिळवून भाजपच्या गटाने दुसऱ्यांदा विजयाची परंपरा कामय ठेवली. विरोधी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीपासून माजी सभापती बसवराज बिराजदार यांच्या गटाचे वर्चस्व होते ते वर्चस्व या निवडणूकीतही कायम ठेवण्यात त्यांना यश आले आहे.निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पॅनेलप्रमुख बिराजदार यांनी शेतकरी सभासद हिताचा निर्णय आणि नियोजनबद्ध कारभाराची माहिती शेतकरी सभासदांसमोर मांडल्याने सभासदांनी विश्वासाने दुसऱ्यांदा पॅनलच्या तेरापैकी अकरा उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले तर भाजप गटाची एक जागा यापूर्वी बिनविरोध निघाली आहे.
सभासदांनी सत्ताधाऱ्यांवर विश्वास दाखवत पुन्हा एकदा सत्ता बहाल केली आहे. काँग्रेसला या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला आहे.
उटगी सोसायटीची निवडणूक जाहीर झाल्यापासून येथे मोठी चुरस पहायला मिळाली. बिराजदार यांनी अनुभवी कार्यकर्त्यांसह तरुणाईला सोबत घेत प्रचाराच्या रणधुमाळीत आघाडी घेतली होती.यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या राखीव प्रवर्गातून भुजिंगा कांबळे हे एक भाजपचे उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहे.
मतदान प्रक्रियेत सर्वसाधारण कर्जदार गटात पाटील सिद्धण्णा रुद्रगोंड,तेली रेवाणा ईश्वरप्पा,केसगोंड द-याप्पा गिरमला,कत्ते सिद्धाप्पा संगाणा,तिकोंडी यासीन अमिन, कोळगेरी प्रकाश रामनिंग,पवार जिवलू बाळू हे सर्वजण सत्ताधारी भाजपच्या गटातून तर बिरादार विजयकुमार शिवनिंगप्पा हे एकमेव काँग्रेस गटातून निवडून आले आहेत. इतर मागासवर्गीय गटामधून मंजुनाथ बसवराज बिराजदार हे निवडून आले आहे. तर भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून नितीन अवजी, महिला राखीव गटामधून सौ.काशीबाई दुधगी आणि सौ.लक्ष्मीबाई बाबर ह्या
विजयी झाल्या आहेत. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात येत आहे.