जत, संकेत टाइम्स : येथील जेष्ठ कृषितज्ञ दिनकर पतंगे यांची वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाच्या सदस्यपदी (जागतिक खासदार) निवड झाली आहे. त्या आशयाचे अधिकार पत्र श्री.पतंगे यांना श्रीरामपूर येथील व्हिआयपी गेस्ट हाऊस सभागृहात झालेल्या एका समारंभात प्रदान करण्यात आले.
समाजाच्या विविध क्षेत्रात राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणमान्य व्यक्तींचा “वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड ” देऊन सन्मान केला जातो व संबंधीत क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीस ” वर्ल्ड पार्लमेंट मेंबर ” ( जागतिक संसद सदस्य ) म्हणून नियुक्त केले जाते. तश्या आशयाचे प्रमाणपत्र डब्ल्यूसीपीएचे ग्लोबल प्रेसिडेंट प्रा.डॉ. ग्लेन टि मार्टिन (युएसए) यांच्या स्वाक्षरी निशी दिले जाते.
२५ जून २०२२ रोजी श्रीरामपूर येथे “वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२२” चे वितरण करण्यात आले. त्या बावीस गणमान्य व्यक्तींमध्ये जत (सांगली) येथील जेष्ठ कृषीतज्ञ मा.श्री. दिनकर पतंगे यांचा समावेश होता.श्री.पतंगे कृषी क्षेत्राशिवाय सामाजिक, पर्यावरण योगाभ्यास, निसर्गोपचार व आरोग्य या क्षेत्रातही लोकाभिमुख काम करण्यात अग्रेसर आहेत. त्याचबरोबर ते सांगली जिल्ह्याचे लायन्स क्लब रिजन 3 चे रिजन चेअरमन आहेत. श्री.पतंगे क्रांती न्यूज जत प्रतिनिधी असून प्रसार माध्यमातही त्यांचे काम प्रशंसनीय असे आहे.
श्री.पतंगे यांच्या या सर्वांगीण कामगिरीची दखल घेऊन त्यांना या वर्षीचा “वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड ” देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी वर्ल्ड पार्लमेंट ( डब्ल्यूसीपीए ) चे महाराष्ट्र चॅप्टर प्रेसिडेंट डॉ. दत्ता विघावे, सचिव बाबासाहेब वाकचौरे, सहसचिव ऋषिकेश विघावे, कार्यकारीणी सदस्य प्रा. अरूण सावंग, सामाजिक कार्यकर्ते तानाजी मराठे, प्राचार्य एन.एस भोसले आदि मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे येथील जेष्ठ पत्रकार व सा.अभिनव खान्देशचे संपादक मा. श्री. प्रभाकरराव सुर्यवंशी हे होते.
श्री. पतंगे यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.