सध्या पावसाचे दिवस आहेत. पाऊस महत्वाचा म्हणून आपण पावसाची आतुरतेने वाट पाहतो. पाऊस जर वेळेवर आणि पुरेसा पडला नाही तर देशात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते. पाच ते सहा वर्षांपूर्वी देशात पुरेसा पाऊस पडला नाही त्यावेळी आपली काय अवस्था झाली होती हे आपण जाणतोच. पुरेसा पाऊस न झाल्याने मराठवाडा विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया होती. पिण्याच्या पाण्यासाठीही लोकांना वणवण भटकावे लागत होते. हंडाभर पाण्यासाठी मैलभर चालत जावे लागत होते. लातुर सारख्या दुष्काळी भागाला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागत होता.
पाऊस न पडल्याने शेतातही काही पिकत नव्हते त्यामुळे पावसाने थोडी जरी ओढ दिली की आपण देवाला साकडे घालतो, होमहवन करतो त्याचे कारण म्हणजे आपली अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. शेतीला पाणी लागते. राज्यातील सत्तर टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. पुरेसा पाऊस झाला तर ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग आनंदी होतो. समाधान व्यक्त करतो तसा शहरी भागातील माणूसही सुखावतो कारण पुरेसा पाऊस झाला आणि शेती पिकली तरच शहरी उत्पादनाची मागणी वाढते अर्थचक्र गतिशील होते. हे सारे खरे असले तरी अलीकडे शहरी भागातील लोकांना पावसाची भीती वाटते! कारण शहरातील पाऊस आणि त्यामुळे निर्माण होणारी आपत्ती. मागील काही वर्षात शहरी भागात विशेषतः मुंबईत पावसाने हाहाकार उडवला आहे.
मुंबईत एक जरी मोठा पाऊस झाला तर मुंबईची दैना होते. या पावसात मुंबईकरांचे जे हाल होतात ते आपण टीव्हीवरच पाहतोच. मुंबईचा पाऊसही अजब आहे महिना महिनाभर कोसळत नाही पण जेंव्हा कोसळतो तेंव्हा कोणाचे ऐकत नाही. दोन महिन्याची सरासरी दोन तासात भरून काढतो. कधीकधी सलग तीन चार दिवस कोसळत असतो. त्यामुळे या पावसात आपण कोणत्या आपत्तीत तर सापडणार नाही ना? बाहेर पडल्यावर सुरक्षित घरी येऊ ना? घरात तरी आपण सुरक्षित राहू का? अशा असंख्य प्रश्नांचे गाठोडे घेऊन शहरी भागातील लोक पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगत असतात. झाडे पडणे, उघड्या गटारातून माणसे वाहून जाणे, इमारती, भिंती कोसळणे असे प्रकार पावसाळ्यात नेहमीच घडत असतात. मुंबईकरांचा जीव तर अत्यंत स्वस्त झाला आहे. कोणत्या वळणावर मृत्यू आपल्याला गाठेल हे मुंबईकरांना सांगता येईनासे झाले आहे.
हा अनुभव असताना आता मुंबईकरांच्या चिंतेत भर घालणारी नवी माहिती समोर आली आहे ती म्हणजे, अरबी समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. १९९० ते २०१९ या कालावधीत घेतल्या गेलेल्या सॅटेलाईट चित्रांच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. आतापर्यंत १०७ चौरस किलोमीटर इतका भूभाग समुद्राखाली गेला आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे ही मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे असे जाणकारांचे मत आहे. अर्थात याला आपणच जबाबदार आहोत. नैसर्गिक अधिवासात मानवाचा हस्तक्षेप वाढल्यानेच समुद्राची पातळी वाढत आहे. जर अजूनही अशाच प्रकारे हस्तक्षेप वाढत राहिला तर संपूर्ण मुंबईला पुराचा धोका जाणवेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
समुद्रकिनारी असलेल्या सोसायट्या व घरे यांना भविष्यात अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांचे जीवनच धोक्यात आले आहे. अर्थात हा धोका फक्त मुंबईलाच नाही तर समुद्रकिनारी राहणाऱ्या सर्वच लोकवस्त्यांना जाणवणार आहे. भविष्यातील हा धोका ओळखून आताच शहाणे व्हावे लागेल.