सांगली | पैशासाठी खोटे लग्न,सांगलीतील तरूणांला फसविले | पावणेदोन लाखांचा गंडा,माय-लेकीला पकडले

0
17
विटा : मुलीचे खोटे लग्न लावून देऊन दत्तात्रय नागेश हसबे (वय ३१, रा. हिवरे, ता. खानापूर) या तरुणाला एक लाख ७५ हजार रुपयांना फसविल्या प्रकरणी सोलापूर व कर्नाटक राज्यातील पाच जणांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
जयश्री गदगे (रा. जुगुल, ता. चिकोडी, कर्नाटक), सुनील दत्तात्रय शहा (रा. निपाणी, कर्नाटक), धनम्मा उर्फ धानुबाई नागनाथ बिराजदार, मुलीची आई दीपाली विकास शिंदे व मुलगी प्रियांका विकास शिंदे (सर्व रा. सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत. मुलीची आई दीपाली शिंदे (वय ४०) व नववधू प्रियांका शिंदे (वय २१) यांना अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी,हिवरे येथील दत्तात्रय हसबे या तरुणाचा विवाह जमत नव्हता. त्यामुळे हसबे हा त्याचा मित्र संजय खिलारी याच्या ओळखीच्या कर्नाटकातील जयश्री गदगे या लग्न जुळविणाऱ्या महिलेकडे दोघेजण गेले. त्यावेळी संबंधित महिलेने सोलापूर येथे मुलगी चांगली आहे. परंतु, मुलीच्या घरच्यांना एक लाख व लग्न जुळविणारे एजंट सुनील शहा व धनम्मा उर्फ धानुबाई बिराजदार यांना ७० हजार रुपये द्यावे लागतील,असे सांगितले. मोबाइलवर मुलगी प्रियांका शिंदे हिचा फोटो पाहून हसबे याने पैसे देण्यास होकार दिला.

मुलगीला हिवरेत येण्यासाठी हसबे याने जयश्रीला ऑनलाइन पाच हजार रुपये दिले. दि. २७ जुलै रोजी रात्री नऊ वाजता संशयित जयश्री गदगे, सुनील शहा, धनम्मा बिराजदार, मुलगी प्रियांका व तिची आई दीपाली शिंदे हे गावात आले. त्याच रात्री दोघांचा विवाह लावून दिला.

यानंतर दि. ३० जुलै रोजी दीपालीही हिवरे आली. तिने कपडे घ्यायची आहेत, असे सांगून मुलीला घेऊन भिवघाटातला गेली. त्यांच्यासोबत दत्तात्रय व नातेवाईक गेले. दीपालीने भिवघाटातून प्रियांकाला सोलापूर घेऊन जाण्याची तयारी केली. दत्तात्रयने तिला विचारणा केली असता खोटे लग्न लावून देण्यासाठी २० हजार रुपये दिल्याचे दीपालीने सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दत्तात्रय हसबे याने विटा पोलिसांत जयश्री गदगे, सुनील शहा, धनम्मा बिराजदार, दीपाली शिंदे व प्रियांका शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दीपाली व प्रियांका शिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here