– रियाज जमादार
गावात एकोपा रहावा, गावातील तरुण वर्ग हेवेदावे, इर्षा बाजूला ठेवून समाजकार्यासाठी मंडळाच्या माध्यमातून एकसंघ व्हावेत यासाठी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी जतसह मंगळवेढा तालुक्यात जे गाव एक गाव एक गणपती मोहीम राबवेल त्या गावाला मोफत श्री ची मुर्ती देणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य मानव अधिकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय धुमाळ, सलीम अफराद, दत्ता सावळे, जयदीप मोरे. मानतेस स्वामी शिद्रया मोरे .चेनाराम पटेल महेश भोसले बाळासायब वाघमोडे आदी उपस्थित होते.
हभप तुकाराम बाबा महाराज यांनी गुरू श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य २०१० पासून मंगळवेढा तालुक्यात तर २०१९ पासून जत तालुक्यात ‘एक गाव एक गणपती’ राबविणाऱ्या गावांना श्री ची मोफत मूर्ती भेट देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला. अकरा वर्षात हजाराहून अधिक श्री च्या मुर्तीचे वाटप जत व मंगळवेढा तालुक्यात करण्यात आले आहे. कोरोना काळात तुकाराम बाबा महाराज यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविणाऱ्या मंडळासह तालुक्यातील बहुसंख्य मंडळांना मास्क, सॅनिटायझर व वृक्ष भेट देण्याबरोबरच कोरोना काळात जनजागृतीही केली आहे. दुष्काळ, महापूर, कोरोना, नैसर्गिक आपत्ती, अपघातासारख्या घटना घडल्यानंतर तुकाराम बाबांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
तुकाराम बाबा महाराज म्हणाले, श्री संत गाडगेबाबा, श्री संत बागडेबाबा यांच्या विचारांचा प्रचार, प्रसार व्हावा, समाजजागृती व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. गावोगावी अनेक कारणांमुळे एकापेक्षा अधिक गणपती बसविले जातात. त्यापेक्षा प्रत्येक गावात एकच गणपती बसवून समाजप्रबोधन, समाजजागृती, गावातील गोरगरिबांना सहकार्य, शाळा व गरीब मुलांच्या शिक्षणांसाठी योगदान आदी उपक्रम हाती घेतले तर गावचा कायपालट तर होईलच शिवाय सशक्त भारत निर्माण करण्यात आपला वाटा मोठा असेल.
प्रत्येक गावात एक गाव एक गणपती हा अभिनव उपक्रम राबवावा. मंडळांनी १५ सप्टेंबर पर्यत श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या सदस्याकडे नोंदणी करावी असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी केले.