शिराळा : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. अतिवृष्टी होत असल्याने पाणलोट क्षेत्रातुन हजार ९८५१ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने सोमवारी दुपारी धरणाचे वक्राकार चारही दरवाजे खुले करण्यात आले आहेत. त्यातून १६७५ क्युसेक विसर्ग व जलविद्युत केंद्राकडून १३७५ असा एकूण ३००० क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडणेत येत आहे. त्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद झाली.
मुसळधार पावसाचे प्रमाण वाढल्यास आणखी विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावानी सतर्कता बाळगावी असा इशारा धरण प्रशासनामार्फत देण्यात आला आहे. चांदोली धरण परिसरात सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या २४ तासात ६४ मिलिमीटर तर आज सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत आठ तासात ३५ मिलिमीटर असा एकूण ३२ तासात ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज अखेर एकूण १४८७ मिलिमीटर पाऊस येथे बरसला आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने येथे पूर्णपणे उघडीप दिली होती. मात्र गेल्या दोन दिवसापासून पुन्हा मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी सोमवारी दुपारी तीन वाजता धरणाचे चारही दरवाजे उघडून १ हजार ३२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. वीज निर्मिती केंद्रातून १६७५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण व वीजनिर्मिती असा दोन्ही मिळून ३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.