कवठेमहांकाळ : रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव(ता.-कवठे महांकाळ) येथील टोलनाका सुरू झाल्याने टोल चुकविण्याच्या उद्देशाने वडाप तसेच इतर खाजगी वाहने मिरज,सांगलीकडे जाण्यासाठी देशींगमार्गे असलेल्या पर्यायी रस्त्याचा वापर अलीकडे जास्त करताना दिसत आहेत.यामुळे गेल्या काही दिवसापासून या रस्त्यावरची रहदारी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुळातच कवठे महांकाळ मधून देशिंगमार्गे खरशिंगहून पुढे जाऊन रत्नागिरी ते नागपूर या महामार्गाला मिळणारा रस्ता अरुंद असून लोकवस्तीतून जाणारा आहे.रस्त्याची अवस्था देखील ठिकठिकाणी पावसामुळे खड्डी पडल्याने खराब झाली आहे.मोरगाव तसेच खरशिंग मध्ये या रस्त्याला लागूनच मराठी शाळा आहेत.देशिंग येथील विद्यार्थ्यांना देखील हायस्कूल मध्ये जाण्यासाठी याच रस्त्यावरून जावं लागते.अग्रणी नदीवरील पुलाची अवस्था देखील खराब असून जड वाहनासाठी हा पूल धोकादायक बनला आहे.जाधव मळ्याजवळ नरघोल ओढ्याला लागून असलेल्या धोकादायक वळणामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने याअगोदर देखील अपघात घडले आहेत.
देशिंगमध्ये प्रमुख चौक असलेल्या बस स्टॉपजवळ तर हा रस्ता खूपच अरुंद असल्याने या वाढलेल्या रहदारी मुळे त्याठिकाणी वाहनांची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कवठे महांकाळ येथे देशिंग कॉर्नर जवळ दवाखान्याची संख्या जास्त असल्याने दवाखान्यात भरती झालेल्या रुग्णांना कर्णकर्कश हॉर्नमुळे त्रास होऊन जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासर्व बाबीकडे बघता हा रस्ता स्थानिक लोकांसाठी जीवघेणा ठरत असल्याने कवठे महांकाळ ते खरशींग रस्त्यांचे रुंदीकरण होऊन स्थानिक लोकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी या रस्त्यावर लोकवस्ती असलेल्या ठिकाणी तसेच शाळा असलेल्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची तसेच या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.