तासगाव : तू बारीक आहेस. मला सोडचिठ्ठी दे, असे म्हणून पत्नीस मारहाण केल्याची घटना तासगाव तालुक्यातील पेड येथे घडली आहे. याप्रकरणी अश्विनी मंडले यांनी पती दीपक बाजीराव मंडले यांच्याविरोधात येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून दीपक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, दीपक व अश्विनी यांच्यात किरकोळ कारणावरून सातत्याने वाद होत आहेत. यापूर्वीही वादवादीतून मारहाणीच्या घटना घडल्या होत्या. मात्र संसार मोडायला नको म्हणून वाद मिटवण्यात आले होते. पण, तरीही दोघांमधील वाद सुरूच आहेत. आता तर दीपक हा ‘तू बारीक आहेस. मला सोडचिठ्ठी दे’, असे म्हणून अश्विनी हिला मारहाण करीत आहे.
आज गुरुवारी सकाळी 9.30 च्या दरम्यान पुन्हा पती दीपक याने अश्विनी हिला लाथा – बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अश्विनी यांनी दीपक यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून दीपक याच्यावर भा. द. वि. 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.