तासगाव : तासगाव आगाराचे बसचे वेळापत्रक कोलमडले आहे. ग्रामीण भागात एकाही गावात बस वेळेवर येत नाही. आगार व्यवस्थापकांच्या नियोजनशून्य कारभारामुळे विद्यार्थी, महिला, अबाल वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. आज गुरुवारी तर तालुक्यातील तुरची येथे बस वेळेवर न आल्याने सरपंच विकास डावरे यांनी विद्यार्थ्यांना घेऊन चक्क 10 किलोमीटर चालत तासगाव बसस्थानकावर मोर्चा काढला. बसस्थानकावर ठिय्या मारत अधिकाऱ्यांना खडसावून जाब विचारला.
तासगाव आगाराचा बेधुंद कारभार अनेकवेळा चव्हाट्यावर आला आहे. आगाराकडे आवश्यक बस नाहीत. आहेत त्या बसची अवस्था भंगार झाली आहे. अनेक बस रस्त्यातच बंद पडत असतात. त्यातच आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुखांच्या ढिसाळ कारभारामुळे बसच्या फेऱ्यांचे वेळापत्रक पुर्णपणे कोलमडले आहे. तालुक्यातील एकाही गावात बस वेळेवर पोहोचत नाहीत. 5 – 10 मिनिटं बस उशिराने येणे समजू शकतो. पण, 2 – 2 तास बसच येत नसेल तर विद्यार्थी, महिला, अबाल वृद्धांनी करायचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
तासगाव आगाराच्या नियोजनशून्य कारभाराला लोक वैतागले आहेत. या आगारातील अधिकारी, कर्मचारी अक्षरशः मस्तीला आले आहेत. विद्यार्थी, महिला व इतर प्रवाशांना व्यवस्थित उत्तरे दिली जात नाहीत. लोकांच्या तक्रारीची अजिबात दखल घेतली जात नाही. सद्यस्थितीला तासगाव शहरातील सर्व महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. ग्रामीण भागातून दररोज हजारो विद्यार्थी शहरात ये – जा करीत असतात. शिवाय इतर प्रवाशांचीही मोठी गर्दी असते.
मात्र तासगाव आगाराकडे या सर्व प्रवाशांची सोय होईल, अशी यंत्रणा नाही. अपुऱ्या बस, अपुरे कर्मचारी अशा स्थितीत सगळा भोंगळ कारभार सुरू आहे. परिणामी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. प्रवाशांना ऐन पावसाळ्यात तास – तास बसची वाट पाहत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे तासगाव आगाराबद्दल रोष वाढत आहे.
आज गुरुवारी सकाळी तालुक्यातील तुरची येथे एकही बस वेळेवर आली नाही. बसची वाट पाहत विद्यार्थी – विद्यार्थीनी, महिला, अबालवृद्ध थांबले होते. दीड – दोन तास थांबूनही बस आली नसल्याने सगळेच जण संतापले. दरम्यान, सरपंच विकास डावरे हेही प्रवाशांजवळ पोहोचले. तासगाव आगाराचा भोंगळ कारभार पाहून डावरे यांचा पारा चढला. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
त्यानंतर डावरे यांनी विद्यार्थी व प्रवाशांना घेऊन चक्क 10 किलोमीटर चालत बसस्थानकावर मोर्चा काढला. तुरची ते तासगाव आलेला हा मोर्चा बसस्थानकावर धडकला. त्याठिकाणी सर्वांनी ठिय्या मारला. यावेळी बसस्थानकाच्या अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थी व सरपंच डावरे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तासगाव आगाराचे बस फेऱ्यांबाबत कोणतेही नियोजन नाही. विद्यार्थी, महिला व आबालवृद्धांनी करायचे काय, असा सवाल करीत डावरे यांनी बसच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. इथून पुढे जर ग्रामीण भागात बस वेळेवर धावल्या नाहीत तर आक्रमक आंदोलन करू, असा इशारा यावेळी डावरे यांनी दिला.
यावेळी उपसरपंच सचिन चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव खरात, सतिश पाटील, भाऊसाहेब खरात, अंकुश पाटील, शरद सातपुते, रोहित गलांडे, ओंकार पाटील, संकेत पाटील व गावातील विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.