सांगली जिल्हात ‘जोरधार’ | जतेत तुरळक | आटपाडी अजून कोरडाठाक

0
4
सांगली :  जिल्ह्यात बुधवारी रात्री अकरापासून गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत सलग 17 तास संततधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आटपाडी तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली. जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यात तुरळक पाऊस आहे. बाकी जिल्ह्यात सर्वत्र संततधार सुरू आहे. परिणामी, जनजीवन गारठले.कोयना धरण व्यवस्थापनाने 2,100 क्यूसेक पाणी सोडले. सांगलीत कृष्णेची पाणी पातळी एक फुटाने कमी होऊन 18 फुटांवर राहिली. अलमट्टी धरणातून दुपारनंतर तब्बल 1 लाख 75 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

 

त्यामुळे नदीची पातळी उतरण्यास मदत होत आहे. जिल्ह्यात बुधवारी पावसाने पूर्ण उघडीप दिली होती. रात्री अकरानंतर मात्र संततधार सुरू झाली. थांबून, थांबून हलका ते मध्यम पावसाच्या सरी बरसत राहिला. हा पाऊस गुरूवारी दुपारी चारवाजेपर्यंत होता. यामुळे शहरातील अनेक रस्ते चिखलमय झाले होते तर रस्त्यावर पाणी साचून राहिले होते. शिवाजी मंडई, चांदणी चौक, मार्केट यार्ड परिसर, स्टेशन चौक आदी ठिकाणी पाणी साचले होते.

 

 

सांगलीसह मिरज, वाळवा, शिराळा, कडेगाव, पलूस, कवठेमहांकाळ तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. जतमध्ये तुरळक पाऊस होता तर आटपाडीत पावसाने पूर्ण पाठ फिरवली. चांदोली धरणातून बुधवारी पाण्याचा विसर्ग 6 हजार 780 क्युसेक केल्याने वारणा नदीची पातळी वाढली होती.

पावसाने कमालीचा गारवा निर्माण झालेला आहे. थंडी, झोंबणारे वारे आणि सततचा पाऊस यामुळे जनजीवन गारठले आहे. पाऊस आणि चिंध्या झालेले रस्ते यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वाहतूक संथगतीने सुरू आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here