तासगाव : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील गैरप्रकार चव्हाट्यावर आणून तेथील कर्मचाऱ्यांना अद्दल घडवणाऱ्या शिवसेनेचे तासगाव तालुका प्रमुख प्रदीप माने, सामाजिक कार्यकर्ते विशाल भोसले व सुनील घेवारी यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सरकारी कर्मचाऱ्यांच्या या मोगलाईविरोधात तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हा खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा. कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निलंबन व्हावे, या मागणीसाठी मंगळवारी तासगाव तालुका बंद ठेवण्यात येणार आहे. तर बुधवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांची संघटना एकवटली आहे.या कर्मचाऱ्यांनी शिरढोणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून माने भोसले व घेवारी यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे.त्या ठिकाणी जो प्रकार घडलाच नाही, अशा अनेक घटना फिर्यादीमध्ये रंगवण्यात आले आहेत. धादांत खोटा गुन्हा दाखल केल्याने प्रदीप माने यांचे मूळ गाव असलेले सावर्डे येथील नागरिक चांगलेच संतापले आहेत. तेथील नागरिकांनी आज कडकडीत गाव बंद ठेवले.यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन कृती समितीची स्थापना करण्यात आली. यापुढील काळात सर्वच शासकीय कार्यालयात बोकाळलेला भ्रष्टाचार बाहेर काढून मस्तवाल सरकारी यंत्रणेला वठणीवर आणू, असा इशारा या बैठकीत देण्यात आला. दरम्यान मंगळवारचा बंद व बुधवारच्या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी उद्या सोमवारी तासगाव पंचायत समितीच्या सभागृहात सर्वपक्षीय नेते, तासगाव तालुक्यातील सर्व सरपंच व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य यांची संयुक्त बैठक होणार आहे. बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.
बैठकीस तासगाव शहर शिवसेनेचे अध्यक्ष विशाल शिंदे, संदीप सावंत, शरद शेळके, दत्तात्रय चवदार, सरपंच अरुण खरमाटे, डॉ. विवेक गुरव, पांडुरंग जाधव, नागनाथ पाटील, पुरण मलमे, शिवाजी गुळवे, पंडीत राजमाने, तानाजी पाटील, शहाजी पाटील, संजय पाटील, अनिल दौंड, विशाल चांदूरकर, निशिकांत माने – पाटील, विलास जमदाडे, आप्पा जमदाडे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.