सांगली : केंद्र व राज्य शासनामार्फत जनसामान्यांच्या विकासासाठी अनेक महत्वाच्या लोकाभिमुख योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या लाभांमुळे जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन होऊन त्यांचे जीवनमान उंचावत आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.सांगली येथील विकासकामाच्या उद्घाटन कार्यक्रमात ना.खाडे बोलत होते.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, जल जीवन मिशन योजनेमुळे घराघरात नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनामार्फत १२ हजार रुपये देण्यात येत असल्याने याचा त्यांना आधार मिळत आहे.जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने टंचाई परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असली तरी नदी व धरणातील उपलब्ध पाणी साठा याचे योग्य नियोजन करून पिण्यासाठी व शेतीला आवश्यक पाणी उपलब्ध करून दिले जाईल. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा ३ मध्ये जिल्ह्यातील १४ रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत. या रस्त्याची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी, असेही पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले.
खासदार श्री. पाटील म्हणाले, शासनाने सामान्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले असून विकास कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जात आहे. निमणी-नेहरूनगर व येळावी परिसरातील लोकांना वाहतुकीसाठी चांगला रस्ता मिळावा यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा ३ मध्ये या रस्त्याचा कामाचा समावेश करण्यात आला. या रस्त्यामुळे परिसरातील लोकांची वाहतुकीची चांगली सोय होणार आहे.