थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज पुरवठा खंडित होणार

0

सांगली : वारंवार आवाहन करून देखील वीज बिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून नाईलाजाने गेल्या २५ दिवसांमध्ये २ हजार ९५३ अकृषक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार १२७ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे २४ कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे.

 

 

दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी सांगली जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २६) व रविवारी (दि. २७) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. विशेष म्हणजे एका महिन्याचे वीज बिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

 

पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत सांगली जिल्ह्यात प्रामुख्याने घरगुती १ लाख ६७ हजार ८०७ ग्राहकांकडे १८ कोटी ७८ लाख रुपये, वाणिज्यिक १४ हजार ३७१ ग्राहकांकडे ३ कोटी ९० लाख रुपये आणि औद्योगिक १ हजार ९४९ ग्राहकांकडे १ कोटी ८९ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे गेल्या २५ दिवसात २ हजार ९५३ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Rate Card

 

वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटी द्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशिल संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे. सध्या सुरू असलेल्या महावितरणच्या धडक मोहिमेमध्ये वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदारांच्या वीजजोडण्याची स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू आहे. थकबाकीदार शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.