सांगली : सांगली शहरातील बँकेत भरणा करण्यासाठी जाणाऱ्या मूर्तीकाराकडील दुचाकीसह ६ लाखांची रोकड पळवून नेहणाऱ्याच्या पोलिसांनी मुशक्या आवळत जेरबंद केले.राजअहमद मेहबुब शेख (वय २२, रा. रामकृष्णनगर, कुपवाड) असे संशयिताचे नाव आहे.या गुन्ह्यातील अन्य एक संशयित सूरज मोरे हा अद्यापही फरार आहे.
गुरुवार ता.२४ रोजी कुपवाड येथील फिर्यादी अक्षय संपत सूर्यवंशी हे त्यांच्या दुचाकीवरून बॅँकेत पैसे भरणा करण्यासाठी ६ लाखांची रोकड घेऊन जात होते. संशयित दोघांनी त्यांचा पाठलाग करून लक्ष्मी मंदिर ते कुपवाड रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ दुचाकीला पायाने धक्का मारून ती पाडून सहा लाखांची रोकड आणि दुचाकी घेऊन संशयित पळून गेले होते.याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला होता.
संजयनगर पोलीस ठाण्याचे एक पथक घटनेचा कसून तपास करत होते.रविवारी पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की,संशयित शेख हा शिंदे मळा परिसरात असणाऱ्या एका महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत बसला आहे.त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले.त्याच्याकडून फिर्यादीची दुचाकी तसेच रोख एक लाख पोलीसांनी ताब्यात केले.
त्याच्याकडे उर्वरित रकमेबाबत विचारणा केली असता, त्याने त्याचा मित्र दुसरा संशयित सूरज काळे हा बाकीचे पैसे घेऊन पळून गेल्याचे सांगितले.त्यानुसार पोलिसांनी आता त्याचा शोध सुरू केला आहे. संजयनगरचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.