सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न आरडीएसएस योजनेमुळे सुटतील,विश्वास पाठक यांचे प्रतिपादन
कोल्हापूर : विजेची वाढती मागणी ध्यानात घेऊन वीज वितरण जाळे बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आरडीएसएस योजनेतून सांगली जिल्ह्यात २५५० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासोबत उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ, जत, विटा यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वीज प्रश्न सुटतील, असे प्रतिपादन एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक मा. विश्वास पाठक यांनी सोमवारी सांगली येथे केले.
महावितरण, महानिर्मिती, महापारेषण, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग यांच्या कामाच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे कामगारमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आ. विक्रमसिंह सावंत, आ. अरुण लाड, महापारेषणचे संचालक संदिप कलंत्री, महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता परेश भागवत आणि महापारेषणचे मुख्य अभियंता चिदाप्पा कोळी उपस्थित होते.
टेंभू तसेच ताकारी म्हैसाळ पाणी योजनांमुळे कवठे महांकाळ, जत, खानापूर व आटपाडी या पूर्वीच्या टंचाईच्या भागात पाणी आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सिंचनासाठी विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासह जिल्ह्याच्या विविध भागांसाठी विजेच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी उपस्थित लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. त्याची नोंद घेऊन मा. विश्वास पाठक म्हणाले की, लोकप्रतिनिधींकडून वीज उपकेंद्रे उभारणे, नवे ट्रान्सफॉर्मर बसविणे, वीज वितरण जाळे बळकट करणे यासाठी आलेल्या सूचनांनुसार मा. पंतप्रधानांच्या आरडीएसएस योजनेत कामे हाती घेण्यात आली आहेत. आगामी अठरा महिन्यात ही कामे पूर्ण होतील व त्यामुळे जिल्ह्यातील वीज पुरवठ्याचे विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील.
ते म्हणाले की, सिंचनासाठी सध्या दिवसा आणि रात्री वीज पुरवठा केला जातो. त्या ऐवजी केवळ दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जेचा वापर करून सात हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हाती घेतली आहे. त्यापैकी साडेतीन हजार मेगावॅट वीजनिर्मितीची टेंडर प्रसिद्ध झाली आहेत. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील १८६ मेगावॅटचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेचा वापर करून एकूण ८२५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.
मा. पंतप्रधानांची आरडीएसएस योजना आणि मा. उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना यामुळे आगामी दोन वर्षात राज्याचे वीज क्षेत्र आमूलाग्र बदलणार आहे. वीज कंपन्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजनांच्या अंमलबजावणीस सर्वाधिक प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
मा. परेश भागवत आणि मा. चिदाप्पा कोळी यांनी अनुक्रमे महावितरण व महापारेषण कंपन्यांच्या जिल्ह्यातील कामगिरीचे सादरीकरण केले. सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात वाढलेली वीज मागणी ध्यानात घेऊन विकसित करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कामांची माहिती त्यांनी दिली.
——-




