सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर मंगळवारी धक्कादायक घटनेने हादरून गेले. एका शिक्षक पतीने आपल्या शिक्षक पत्नीसह कोवळ्या मुलाचा खून करत स्वतःही गळपास लावून आत्महत्या केली.
बार्शी शहरातील उपळाई रस्त्यावर नाईकवाडी प्लाॅटमध्ये ही दुर्देवी घटना घडली आहे. अतुल सुमंत मुंढे (वय ४०), तृप्ती अतुल मुंढे (वय ३५) आणि ओम (वय ५) अशी मृतांची नावे आहेत.बार्शी शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवायला सुरूवात केली आहे.
अतुल मुंढे हे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. तर त्यांच्या पत्नी तृप्ती बार्शीत अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. दोघांना ओम नावाचा पाच वर्षांचा मुलगा होता. या शिक्षक दाम्पत्याचा संसार सुरळीतपणे चालला असतानाच अतुल याने पत्नी तृप्ती हिचा चाकूने गळा चिरून खून केला. नंतर त्याने मुलगा ओम याचा उशीने तोंड दाबून खून केला.
पत्नी आणि मुलाचा खून केल्यानंतर अतुल याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.दोघे घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहत होते.सकाळी उशिरापर्यंत अतुल वा अन्य कोणीही खाली न आल्यामुळे आईने वर जाऊन पाहिले असता हा प्रकार समोर आला.घटनेचे स्पष्ट कारण मात्र अजून समोर आलेले नाही,मात्र अतुलने असे पाऊल उचलण्यामागील कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.