जत: विज बिल भरले नसल्यामुळे मुचंडी, ता. जत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याने हे केंद्र सध्या अंधारात आहे. जिल्हा प्रशासनाचा भोंगळ कारभार त्यामुळे चव्हाट्यावर आला आहे. प्रशासनाने सर्व आरोग्य केंद्रांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी केली आहे.
मुचंडी गावात नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. या आरोग्य केंद्राचे विज बिल आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेने भरले नाही. ग्रामपंचायतीने बील भरावे, यासाठी दबावतंत्र वापरण्यात आले. अखेर विज बिल भरले नसल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून हे प्राथमिक आरोग्य केंद्र अंधारात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी आज तातडीने मुचंडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी मुचंडी गावचे नेते रमेश देवर्षी व शशिकांत पाटील उपस्थित होते.
रवीपाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जिल्हा प्रशासनाचा हा कारभार अत्यंत निंदनीय आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार जनतेच्या आरोग्याबाबत अनेक सुविधा व सवलती देत आहेत. एका व्यक्तीला उपचारासाठी पाच लाख रुपयांपर्यंतची तरतूद शासनाने केली आहे. असे असताना कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज पुरवठा न करणे हे जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा कळस आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वीज बिलाची तरतूद डीपीटीसी अथवा अन्न कोणत्याही मार्गाने तातडीने करावी. तसेच आरोप अधिकारी, कर्मचारी यांच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या तातडीने भराव्यात. लोकांना चांगल्या पद्धतीने आरोग्य सुविधा द्यावेत अशी मागणी केली.