जत : जत शहरासह तालुक्यातील अनेक गावात श्री दत्त जयंती सोहळा मंगळवारी उत्साहात साजरा झाला.भाविक भक्तांनी सर्वत्र ‘दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा गजर केला.दत्त मंदिरात महाआरती, भजन व गुरुचरित्र पारायण झाले. मंदिरांसह अनेकांनी स्वगृही सत्यनारायण पूजन केले. तसेच काही ठिकाणी महाप्रसादाचे आयोजनही केले. शहरात आज दत्त जयंती धार्मिक पद्धतीने व पारंपरिक वातावरणात साजरी केली. गुरुचरित्रातील अध्यायांची आज दत्त जयंतीदिनी सांगता होत असल्याने विविध मंदिरात उत्सव साजरा केला. शहरातील ठिकठिकाणी दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. मंदिरांची आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई केली होती. मूर्तीला नवीन वस्त्र परिधान केले होते.पाने व फुलांच्या आकर्षक सजावटीने गाभाऱ्यातील दत्तमूर्तीचे पूजन केले. भक्तांना केळी, खिचडी वाटप केले.
जत शहरातील पोलीस स्टेशन,पंचायत समिती व स्टँड परिसरातील दत्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन केले होते.आज जयंतीच्या मुख्य दिवशी अभिषेक, पूजा, आरती व प्रसाद वाटप केले.सायंकाळी दत्त जन्मकाळ सोहळा साजरा केला. दत्त दर्शनासाठी सर्वच मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली.
जन्मकाळ सोहळ्यावेळी दत्तांच्या आरतीने मंदिर परिसर गजबजून गेला होता.दत्तजयंतीसाठी जमलेल्या भाविकांनी सामाजिक संस्था, तरुण मंडळांतर्फे भाविकांना प्रसाद वाटप केले. रात्री उशिरापर्यंत मंदिरांमध्ये भजन, प्रवचन, किर्तनाचे आयोजन केले.
–