कोल्हापूर : पुरोगामी विचारांच्या कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असाच एक प्रकार काल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने उघड करण्यात आला आहे. आपला पंधरा वर्षाचा अल्पवयीन मुलगा स्वामींचा अवतार आहे. तुम्ही पाच गुरुवारी माझ्याकडे या ! अशा प्रकारे नागरीकांत अंधश्रध्दा पसरवणाऱ्या आई-वडीलांवर मंगळवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दत्त जयंती निमित्त कदमवाडी रोड कसबा बावडा येथे महाप्रसादाचे वाटप ठेवले होते. यावेळी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. याच वेळी अनिसच्या कार्यकर्त्यांनी पोलीसांना कळविल्यानंतर या भोंदूगिरी चा पर्दाफाश झाला असून आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर शहरातील कसबा बावडा – कदमवाडी रोडवर चौगले कॉलनीत इंद्रायणी हितेश वलादे, त्यांचे पती हितेश लक्ष्मण वलादे यांनी घरातच मंदिरासारखे वातावरण निर्माण केले होते. आपला पंधरा वर्षाचा मुलगा स्वामींचा अवतार आहे. तो जे बोलतो तसेच होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुलदैवताची पूजा करा. स्वामींच्या नावाने प्रसाद वाटप करा. तसेच बाल स्वामींचे ५ गुरुवारी दर्शन घेतल्यास इच्छा पूर्ण होईल. अशा प्रकारे लोकांमध्ये अंधश्रध्दा पसरवली होती. या सर्व प्रकाराची माहिती अनिसच्या कार्यकर्त्या डॉक्टर मुक्ता दाभोळकर यांना कळाली होती.
काल मुक्त दाभोळकर यांनी पुण्यातून सूत्र हलवलीत आणि कोल्हापूर पोलिसांना याची माहिती दिली. काल दत्त जयंती दिवशी या दाम्पत्याने लोकांकडून शिधा मागून जवळपास ५ हजार लोकांना महाप्रसादाचे आयोजन केले होते. सायंकाळी ६ वाजल्यापासून या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासांठी नागरीकांनी रांगा लावल्या होत्या. याबाबत अंधश्रंध्दा निर्मुलन पथकाकडून पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्यासह पोलीसांचे पथक या ठिकाणी पोहोचले. वलादे दाम्पत्यास ताब्यात घेऊन त्यांना चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात आणले.
शाहूपुरी पोलिसांनी या दांपत्याची कसून चौकशी केल्यानंतर पो.उपनिरीक्षक विश्वास कुरणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वलादे दाम्पत्यांवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानूष अनिष्ट,अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध घालणे व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे.कोल्हापुरातील कसबा बावड्यात हा प्रकार खुलेआम सुरू असल्याने ने ही याची गंभीर दखल घेतली आहे. यापुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत भोंदू बाबा चे प्रकार उघडकीस आणून शालेय विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणार असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सांगण्यात आले आहे.