ॐ सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥
‘सगळे सुखी होवोत, सगळे रोगमुक्त राहोत, सगळे चांगल्या आणि मंगल घटनांचे साक्षिदार बनोत आणि कोणाच्याच वाट्याला दुःख न येवो’ असा हा या चार ओळींचा भावार्थ आपल्या प्रत्येकाला व्यापक होण्याची आणि सर्वांचे हित चिंतण्याची महान शिकवण देतो. ख्रिस्ती नववर्षाचे स्वागत करताना भूतकाळातील सर्व हेवेदावे विसरून सर्वांनी हा संकल्प करायला हवा ! सामूहिक प्रार्थनेत आणि सामूहिक उपासनेत प्रचंड बळ असते. ‘संघ शक्ती कलौयुगे’ हा कलियुगाचा मंत्र आहे याचा अर्थ कलियुगात संघटनेतच सामर्थ्य आहे. जेव्हा एखादी प्रार्थना एकत्रितपणे समूहाने केली जाते तेव्हा त्यामध्ये संकल्पशक्ती निर्माण होते. अशी प्रार्थना फलद्रुप होण्याची शक्यता अधिक असते. सामूहिक प्रार्थनेने वातावरणात सकारात्मक स्पंदने निर्माण होतात आणि मनाला त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते. सामूहिक प्रार्थनेचे महत्व आपल्याला शालेय जीवनापासून शिकवले जाते. शाळा भरण्याच्या आरंभी विद्यार्थ्यांकडून सामूहिक प्रार्थना करवून घेतली जाते जेणेकरून निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेने विद्यार्थ्यांच्या बुद्धीवरील आवरण नष्ट होऊन शालेय अभ्यासात त्यांचे मन लागावे. अनेक संप्रदाय, संघटना आणि संस्थांमध्येही सामूहिक उपासनेचे महत्व बिंबवले जाते, इतरांकडून ती करवून घेतली जाते. एकट्याने प्रार्थना करणे आणि तीच प्रार्थना सामूहिकपणे करणे यातील परिणामकारकता भिन्न असू शकते. आपण जेव्हा एकट्याने प्रार्थना करतो तेव्हा मनातील विविध विचारांमुळे आपले मन भरकटून अन्यत्र जाऊ शकते. सामूहिक प्रार्थना करताना आजूबाजूला सर्वजण तीच प्रार्थना करत असल्याने आपले मन एकाग्र होण्यास साहाय्य होते त्यामुळे ती मनापासून होते परिणामी तिची परिणामकारकताही वाढते. कुतूहल म्हणून हा प्रयोग आपणही करून पाहू शकतो. एकट्याने आणि संघटितपणे प्रार्थना केल्यावर मनावर त्याचे काय पडसाद उमटतात हे आपण स्वतःही अनुभवू शकतो. देवाचीही आरतीही आपण एकत्रितपणे करतो त्यामुळे ती अधिक सात्विक होते. राष्ट्रगीत, देशाप्रतीची प्रतिज्ञाही आपण सामूहिकपणे घेतो. त्यामुळे यंदा नववर्षाच्या आरंभी सर्वांच्या कल्याणाकरिता सामूहिक प्रार्थना करूया !
संघटनेत बळ असते, त्यामुळे पशु पक्षी समूहाने राहतात. समूहाने वावरणाऱ्या पशु पक्ष्यांवर हिंस्त्र प्राणी हल्ला करताना विचार करतात. संघटनशक्तीचे महत्व बिंबवणारी काठीची आणि काठ्यांच्या मोलीची गोष्ट आपल्या लहानपणी आपण सर्वांनीच ऐकली असेल. संघटनेत सुरक्षा असते. देशातील जाती-पातीत विखुरलेल्या समाजाचा लाभ घेऊन मूठभर इंग्रजांनी आपल्य्यावर दीडशेहून अधिक वर्षे राज्य केले. आज मराठा समाज संघटीतपणे आरक्षणाची मागणी करत आहे, सभांच्या आणि आंदोलनांच्या माद्यमातून आपले संघटन दाखवून देत आहे, त्यामुळे सरकारलाही त्याकडे विशेष लक्ष द्यावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा संकल्प केल्यावर सर्वप्रथम विखुरला गेलेला मराठा आणि हिंदू समाज एका विचाराखाली एकत्र आणण्यास सुरुवात केली. आदिलशहा, मुघल बादशहा आदींच्या दरबारात चाकरी करणाऱ्या शूरवीर मराठा योध्यांचे प्रबोधन करून त्यांना स्वराज्यात सामील करून घेतले. आज पुन्हा हिंदू समाज जाती-पातींच्या आणि पक्षांच्या विभागणीत विखुरला गेला आहे. राजकीय मंडळी आपल्या राजकीय स्वार्थासाठी समाजात जाती-पातीचे विष पेरत आहेत. धर्मनिरपेक्षतेचे नको तेव्हढे अवडंबर माजवले जात आहे. त्यामुळे आज कोणीही उठतो आणि हिंदूच्या देवतांविषयी, सण-उत्सवांविषयी, प्रथा परंपरांविषयी नको ते बोलतो, अवतारांना आणि धर्मग्रंथांना काल्पनिक म्हणून हिणवतो, हिंदूंच्या प्रथा परंपरांना अंधश्रद्धेचे लेबल चिकटवून हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न केला जातो. हिंदूंची मंदिरे फोडणाऱ्या, तलवारीच्या धाकावर हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या आणि हिंदूंच्या बायाबापड्यांना नासवणाऱ्या आक्रमकांचा जाहीरपणे उदोउदो केला जातो.
हिंदूंना देवतास्वरूप असणाऱ्या गोमातेच्या प्रतिदिन सर्रासपणे कत्तली केल्या जातात, हिंदूंच्या उत्सवांवर, मिरवणुकांवर बंधने आणली जातात. देशात ८० टक्के हिंदू असूनही आज हिंदूंची ही अवस्था आहे. ही स्थिती बदलण्यासाठी हिंदूंनी आज जाती-पातीची आणि पक्षांची बंधने झुगारून संघटित होणे नितांत गरजेचे आहे. हिंदू सहिष्णू आहे. विश्वबंधुत्वाची भावना त्याच्या रक्तातच आहे, त्यामळे संख्येने बहुसंख्य असूनही देशातील पंथनिरपेक्षता टिकून आहे. आज देशात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. आदर्श राज्य म्हणून आजही जगात ;रामराज्या’ची उपमा दिली जाते. संत ज्ञानेश्वर महाराज पसायदानातून विश्वाच्या कल्याणाचे देणे भगवंताकडे मागतात. या भारतभूमीत होऊन गेलेला सर्वच संत महात्म्यांनी आपल्या अभंगांतून आणि लिखाणातून भगवंताकडे विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आहे. विश्वकल्याणासाठी विविध यज्ञयाग आणि होमहवन करण्याची संकल्पना हिंदू धर्माच्या शिकवणुकीचाच भाग आहे. याच व्यापक शिकवणीतून आज विश्वाच्या कल्याणासाठी, विश्वातील दारिद्र्य, दुःख, निराशा नष्ट होऊन प्रत्येक जण सुखी समाधानी आणि सज्जन होण्यासाठी भगवंताकडे प्रार्थना करूया !
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०