विस्तारित योजनेच्या ७ किलोमीटर पाईपलाईनचे काम पुर्ण  जतच्या ६५ गावचा पाणीप्रश्न सुटणार : काम मोठ्या गतीने | २५ तलाव २५० बंधाऱ्यांत पाणी पोहचणार

0
7

जत : जत तालुक्यातील पुर्व भागातील कायम दुष्काळी असणाऱ्या वंचित ६५ गावांसाठी वरदान ठरलेल्या विस्तारीत म्हैसाळ योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम गतीने सुरू असून,तब्बल ७ किलोमीटर लांबीचे पाईपलाईन टाकण्याचे काम पुर्ण झाले आहे. या योजनेत पहिल्या टप्यात ५७ किलोमीटरची सहा फुटी दुहेरी बंदीस्त पाईप लाईन टाकण्यात येत आहे.कामाची गती मोठी असल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.या योजनेवर सतत बारकाईने लक्ष ठेवणारे जतचे माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी नुकतेच मिरज तालुक्यातील आरग पासून ते जतच्या येळदरी पर्यंत योजनेच्या कामाची पाहणी केली.जलसंपदा विभागाचे कार्यकारी अधिकारी रोहित कोरे सह अन्य अधिकारी,पत्रकारांचे शिष्टमंडळही या दौऱ्यात सहभागी झाले होते.

दुष्काळी जतला हरितक्रांतीकडे नेहणारी मुळ म्हैसाळ योजना आता अंतिम टप्यात आली आहे.त्यापाठोपाठ वंचित असणाऱ्या ६५ गावांसाठी राज्य सरकारने दोन हजार कोटींची म्हैसाळ विस्तारीत योजना आमंलात आणली आहे. यातील पहील्या टप्यातील कामाला सुरुवातही झाली आहे. तालुक्यातील ६५ गावे भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहेत, यामुळे जनतेतही मोठा उद्रेक आहे. कोणत्याही स्थितीत दोन वर्षात ही योजना पूर्णत्वास गेलीच पाहीजे असा निर्धार इथल्या जनतेनी केला आहे.याच पार्श्वभूमिवर माजी आमदार विलासराव जगताप, प्रकाशराव जमदाडे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यासह मिरजेपासून ते जतेच्या येळदरी पर्यंत कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून माहीती घेतली. शिवाय कामाची गती आणि बंदीस्त पाईप लाईनची गुणवत्ता पाहून जगताप व जमदाडे यांनी समाधान व्यक्त करत अधिकारी घेत असलेल्या कष्टाचेही विशेष कौतुक केले.

म्हैसाळ विस्तारीत योजना आरग बेडगपासून सुरू आहे. पहील्या टप्यात जतेच्या येळदरी मल्लाळ पर्यंतचा ५७ किलोमीटरचा हा टप्पा आहे. यातील सात किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. एकाचवेळी आरग, बेडग, लोणारवाडी आणि येळदरी अशा तीन ठिकाणी कामाला सुरूवात झाली आहे. बेडगपासून कुडणूर पर्यंत १७०० व्यासाची दुहेरी पाईप लाईन असणार आहे. तिथून पुढेही साडे पाच फुटाच्या लोखंडी दुहेरी पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. यासाठी भारतातील नामांकीत सिमेंट कंपनीकडून या पाईप लाईन तयार करण्यात आल्या आहेत. तर लोखंड पाईप जिंदाल कंपनीच्या असणार आहेत.तसेच तीन ठिकाणी पाण्याचे लिफट असणार आहे. यासाठी बेडग येथे ११०० एच.पी.च्या चार मोटरी, मिरवाड येथे १५०० एच.पी.च्या चार मोटरी, मिरवाड येथे ३००० एच.पी.च्या चार मोटरी असतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

तर मल्लाळ येथे पाण्याचा हौद आणि त्यानंतर पुन्हा मोठ्या दोन वितरीका दोन दिशांनी नेवून ६५ गावांपर्यंत हे पाणी सायपन पध्दतीने नेले जाणार आहे. या योजनेतून २५ मोठे तलाव आणि २५० बंधारे, पाझर तलाव, केटीवेअर, छोटे बांध भरण्यात येणार आहेत. यासाठी २५० क्युसेक्सने यातून पाणी पुरवठा होणार आहे. अवघ्या दोन वर्षात ही योजना पूर्ण करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने आखले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूममधूनही या योजनेच्या कामावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.यावेळी कार्यकारी अभियंता रोहीत कोरे, उपअभियंता डवरी, शाखा अभीयंता ऐनापुरे, रवींद्र सावंत, बाळकृष्ण शिंदे, मिलींद पाटील, अविनाश गडीकर, कुमार नागराळे आदी उपस्थित होते.जत तालुक्याला हक्काचे पाणी विस्तारीत योजनेतूनच मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी या योजनेसाठी सतत पाठपुरावा करून शक्य तितक्या लवकर पाणी आणण्यासाठी काम केले पाहीजे. आज अधिकारी चांगले काम करत आहेत.

कामाचा दर्जाही चांगला आहे. आता सरकारने पुढच्या टप्याचीही टेंडर प्रक्रीया तातडीने राबवावी. या योजनेचे काम थांबणार नाही, याची दक्षता आम्ही घेवू, अधिकाऱ्यांनी शेतकरी, प्रशासन यांच्याशी समन्वय साधत योजनेला गती दयावी. असे मत विलासराव जगताप यांनी व्यक्त केले. प्रकाशराव जमदाडे म्हणाले, खा. संजयकाका पाटील, विलासराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेसाठी सतत पाठपुरावा केला. एक जानेवारी २०२१ व २०२२ रोजी लाक्षणीक उपोषण केले. वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा करत राहीलो, आज काम गतीने सुरू असल्याचे पाहून समाधान वाटले. माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी सहा टीएमसी पाणी उपलब्ध करून मोठी अडचण दूर केली आहे. यापुढे उमदी, अककळवाडी या शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाईपर्यंत योजनेच्या कामावर लक्ष ठेवू. सर्वांनीच यासाठी सहकार्य व पुढाकार घ्यावा.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here