सांगली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान ) योजनेंतर्गत 16 व्या हप्त्याचे वितरण होणार आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सन्मान निधी वर्ग करण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न असणे व e–KYC पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे. या योजनेंतर्गत प्रलंबित पात्र लाभार्थ्यांनी PMKISSAN App चा उपयोग करून e–KYC प्रमाणीकरण करून घ्यावे आणि बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.
ज्या पात्र खातेदारांचे खाते आधार संलग्न नसेल व e –KYC केलेली नसेल त्यांच्या खात्यावर पी.एम.किसान सन्मान निधी वर्ग होणार नाही. ज्या पात्र खातेदार लाभार्थ्यांचे बँक खात्याशी जोडणी नसेल व e –KYC केलेली नाही अशा लाभार्थ्यांनी आधार जोडणी व e –KYC तात्काळ करून घ्यावी. e–KYC सामाजिक सुविधा केंद्र (CSC) येथून करता येईल आणि ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत जाऊन खाते आधार संलग्न करावे.
केंद्र शासनाने pmkisan पोर्टलवर फार्मर कॉर्नर (Farmer Corner) मध्ये OTP आधारे तसेच सामाईक सुविधा केंद्राद्वारे लाभार्थ्याची e-kyc करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. केंद्र शासनाने विकसित केलेल्या PMKISSAN App मोबाईल वर Face Authentication व्दारे पात्र लाभार्थ्यांना e–KYC प्रमाणीकरण करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वतःचे e–KYC प्रमाणीकरण आणि इतर ५० लाभार्थ्यांचे सुद्धा e–KYC प्रमाणीकरण करता येणार आहे. सद्यस्थितीत या योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये e–KYC प्रमाणीकरण करण्यासाठी 5 हजार 257 लाभार्थी प्रलंबित आहेत. तसेच आधार बँक खात्याशी जोडणी करण्यासाठी 13 हजार 145 लाभार्थी प्रलंबित असल्याचे श्री. कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.