तासगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील ऋषिकेश ट्रेडर्स या आडत दुकानात निंबळक (ता. तासगाव) येथील बेदाणा उत्पादक शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे. या दुकानात शेतकऱ्याला 83 हजार 475 रुपयांचा गंडा घातला आहे. या शेतकऱ्याला आठवडाभरात न्याय न मिळाल्यास बाजार समिती समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा बाजार समितीचे संचालक महादेव पाटील यांनी दिला आहे.
याबाबत महादेव पाटील यांनी दिलेली माहिती अशी : निंबळक (ता तासगाव) येथील विश्वास जगन्नाथ पाटील व महादेव जगन्नाथ पाटील यांनी आपला बेदाणा माऊली कोल्ड स्टोअरेज, कुपवाड येथे ठेवला होता. हा बेदाणा दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी सौद्यासाठी तासगाव येथील ऋषिकेश ट्रेडर्स या आडत दुकानात आणला होता. या ठिकाणी पाटील यांच्या बेदाण्याचे हिरवा व काळा अशा पद्धतीने वर्गीकरण करण्यात आले होते. मात्र चुकून दोन्ही बेदाण्याच्या कलमास VJP – 53 असा कोड पडला.यातील हिरव्या बेदाण्यास 105 रुपये व काळ्या बेदाण्यास 72 रुपये असा सौद्यात दर मिळाला. यानंतर हा बेदाणा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने काळ्या बेदाण्याऐवजी हिरवा बेदाणा ऋषिकेश ट्रेडर्स मधून उचलून नेला. तर काळा बेदाणा त्याच आडत दुकानात पडून राहिला.
दरम्यान 105 रुपये दराचा बेदाणा नेल्यानंतर व्यापाऱ्याने शेतकऱ्याला मात्र 72 रुपये प्रमाणे काळ्या बेदाण्याचा दर देऊन फसवणूक केली आहे. हिरव्या बेदाण्याच्या 53 बॉक्सची रक्कम 83 हजार 475 रुपये होते. ही रक्कम आजतागायत शेतकऱ्याला देण्यात आली नाही. याबाबत आडत दुकानदारास विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.हिरव्या व काळ्या बेदाण्यास एकच कोड टाकल्यामुळे असे झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून संबंधित शेतकऱ्याला 83 हजार 475 रुपये मिळाले नाहीत. याबाबत बाजार समितीचे संचालक महादेव पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ऋषिकेश ट्रेडर्समधील फसवणूक चव्हाट्यावर आणली आहे.
मुळात शेतकऱ्यांना ज्या दिवशी सौदा होतो त्याच दिवशी पैसे देण्याचा नियम आहे. तासगाव बाजार समितीत मात्र बेदाण्याचे पैसे देण्यासाठी 30 दिवस घेतले जातात. निंबळक येथील शेतकऱ्याला काळ्या बेदाण्याचे 72 रुपये प्रमाणे जे पेमेंट मिळाले तेही 45 दिवसानंतर मिळाले आहे. तर हिरव्या बेदाण्याचे अद्याप 83 हजार 475 रुपये येणे बाकी आहेत. या शेतकऱ्याला ऋषिकेश ट्रेडर्स मधून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्याची कोणीही दखल घेत नाही.याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याला आठ दिवसात न्याय मिळाला नाही तर बाजार समिती समोर आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. दरम्यान या प्रकाराबाबत संबंधित शेतकऱ्याने सहाय्यक निबंधक कार्यालय, बाजार समितीकडे लेखी तक्रार केली आहे.