पत्राच्या निमतान तरी कुशाली कळता ह्या एक चांगला झाला म्हणायचा. तुमच्यासारक्या जाणत्या माणसाशी माका बोलॉक मिळाला, ह्या माझा भाग्यच मी समजतंय. लय दिसांपासून ईचार करत हुतंय, मराठी भाषेबद्दल आपल्या सर्वांका कायतरी करुक व्हया. आज काय तो योगा-योग जुळून इलो आसा त्याच्याबद्दल खराच माका लय आनंद वाटत आसा. माझ्या मनातल्या ज्या काय भावना आसत त्या माझ्या तुटक्या-फुटक्या शब्दातून तुमका सांगतलंय. माझा काय चुकला-माकला आसात, तर आधीच तुमच्याकडे हात जोडून माफी मागतय. तुमचा उत्तर माका नक्की कळवा.
मराठी भाषेबद्दल आता तुमका आणि काय येगळा सांगॉ…? आता तुमीच माका सांगा. मराठी भाषा म्हंजे आमचो जीव की पराण, आमचा परेम, आमचो जिवाळो, आमची माया, आमची आपुलकी, आमची शान, आमच्या संस्कृतीचा खरा वरदान. पण, हीच मराठी भाषा आता खयतरी संपत जात आसा अशी मनाक चिंता वाटत आसा. काय कळाक आता मार्ग न्हाय उरलो. हयसर-थयसर गेलास तरी इंग्रजी शब्दांचोच जास्त वापर होताना गमता.
पूरईपासून आपल्या राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यात मराठी बोलली जात आसा. जशी की संस्कृत, मराठी, वऱ्हाडी, मालवणी, कोंकणी. पण, गेली धा-बारा ईरसापासून सगळीकडे काय येगळीच चित्रा गमत आसत. मराठी शब्दांपेक्षा इंग्रजी शब्दांचोच जास्त वापर केलो जात आसा. त्याचा मुख्य कारण तुमका म्हायत आसा का…???? आमच्या गावातना गेली धा-बारा ईरसापासून अनेक पिढ्यानपिढ्या मुंबईत रव्हॉक गेली आसत. सगळ्यांनी आपलो परपंच थयचं थाटल्यांनी आणि गावाकडे पाठ फिरवल्यांनी. आता ते गावचे कोकणी माणूस रव्हले न्हाय, तर मुंबईचे चाकरमनी झाले आसत. सगळ्यांनी आपली पोरा-टारा इंग्रजी शाळेतना पाठवल्यांनी. आता जर त्या पोरांका इंग्रजी शाळेतना पाठवल्यांनी तर ते मराठी कशे काय बोलतले..?? मराठी वाङ्मयात देखील कोणीतरी म्हटल्यान आसा “ल्हान मूल म्हणजे मातीचो गोळो, आकार देऊ तशी मूर्ती घडता.” आज या वाक्य खरा होत आसा. तसाच सगळ्या लोकांनी मुंबईक रव्हॉन मुंबईकर झाले आसत. ईद्यार्थी शाळा, ईद्यालयातना जातत. तर तरुण लोका कार्यालयातना जातत. सगळीकडे जास्तीत जास्त इंग्रजी भाषेचोच वापर केलो जाता. त्यामुळे लोकांका मराठी भाषेचो ईसर पडून इंग्रजी भाषेचो पुळको जास्त येत आसा.
माका तुम्ही सांगा…? आपण मराठी-मराठी बोलताव. पण, अशी कित्येक लोका आसत जी दिवसातून ४०% शब्द इंग्रजीतच वापरतत आणि उरलेली ६०% मराठी वापरतत. जसा की येळ काय झाली आसा? बोलूच्या जागी टाईम काय झालो आसा? या ईचारतात. मी थोडो व्यस्त आसय बोलूच्या जागी मी थोडो बिझी आसय आसा बोलतत. माका उशीर झालो बोलूच्या जागी, माका लेट झाला आसा बोलतत. आता माफ कर बोलूच्या जागी, सॉरी हा…. आसा बोलतत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, महिन्यांच्याजागी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च याच महिन्यांचो बोलताना जास्त वापर करतत. माका लय चिंता वाटत आसा की, इतर भाषेमुळे मराठीचो शेवट होव्क काय वेळ न्हाय लागायचो. आपल्याक आतापासूनच कायतरी सुधारणा करूक व्हयी.
सगळ्यात पयला म्हंजे आपल्याक सर्वांका खयपण आणि कोणाशीपण बोलताना मराठी शब्दांचोच आणि भाषेचो जास्त वापर करूचो लागात. समोरचो इसम इतर भाषिक असलो तरी, आपल्याक त्याच्याशी बोलताना पयल्यांदा मराठी भाषेचोच वापर करूचो आसा. तुम्ही इतर राज्यात जर गेलास तर तुमका थय दिसात की थय फक्त त्यांचीच राज्यभाषा वापरली जाता. जसा की कर्नाटका, केरळा, तामिळनाडू. मग आपण महाराष्ट्रात ऱ्हाव्न इतर भाषा कित्या बोलायच्या? पोरा-टारांपासून ते म्हाताऱ्यां-कोताऱ्यांपर्यंत सगळ्यांका मराठी भाषेचा महत्व परत एकदा पटवून सांगॉक व्हया. पेपर, पुस्तका, मासिका वाचूक देव्क व्हयी. दूरदर्शन संच्यावर मराठी मनोरंजन कार्यक्रम बघूक व्हयेत. मराठी सण, उत्सव, जत्रा, पालखी, दिंडी, आणि इतर सांस्कृतिक कार्येक्रमातना सहभागी होव्क व्हया. जेवढी मराठी शाळा ओसाड पडत चाललेली आसत तेवढी शाळा पुन्हा नव्यान चालू करुक व्हयी. नव्या पिढीचो ईकास ह्यो मराठी शाळेपासूनच होतोलो आसा. ह्या लक्षात ठेव्क व्हया.
खयपण नेह्मी बोलताना
मराठी शब्दांकाच वापरूया,
मावळ संस्कृती जोपासून
भाषेचो ईकास घडवूया.!
मालवणचो गावकरी,
भूषण सहदेव तांबे.




