मुळशी पॅटर्न फेम अभिनेते रमेश परदेशी यांचा एक व्हिडीओ सध्या सामाजिक माध्यमांवर तुफान चर्चेत आहे. पुण्यातील एका टेकडीवर धावण्यासाठी गेलेल्या परदेशी यांना दोन महाविद्यालयीन तरुणी नशेत झिंगताना दिसल्या. त्यापैकी एकीची नशेमुळे शुद्ध हरपली होती, तर दुसरीच्या तोंडातून अति नशा केल्यामुळे फेस येत होता. राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये नशेच्या आहारी जाणारी तरुण पिढी, पुण्यातील पान टपऱ्यांवर शाळकरी मुलांना सहज उपलब्ध होणारे अमली पदार्थ, विद्यार्थ्यांकडे पालकांचे होत असलेले दुर्लक्ष यासोबतच गेल्या काही महिन्यांत पुण्यातून उघड होणारे अमली पदार्थाचे वेगवेगळे रॅकेट्स यांवर प्रकाश टाकत त्यांनी या सर्व परिस्थितीचा व्हिडीओ तयार करून सामाजिक माध्यमांवर टाकला आहे. मागील ५-६ दिवसांत पुणे पोलिसांनी पुण्यात विविध ठिकाणी छापे मारून जप्त केलेले अमली पदार्थ, या अमली पदार्थाच्या रॅकेटचे राजधानी दिल्ली आणि थेट विदेशाशी असलेले संबंध यांमुळे पुणे चर्चेत असतानाच परदेशी यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पुण्यातील या अमली पदार्थाच्या विळख्यात पुण्यातील तरुणाई सापडत चालल्याचे उघड झाले आहे.
पुणे शहराला हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा लाभला आहे, पुण्यातील अनेक भागात हा वारसा आजतागायत जतन करण्यात आलेला आहे. पुण्यात साजरे केले जाणारे सण आणि धार्मिक उत्सव यानिमित्ताने राज्यातील मराठी संस्कृतीचे दर्शन आपल्याला पुण्यातून होत असते. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुण्यातला. पुण्याला अनेक वर्षे महाराजांचा सहवास लाभला आहे. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा अटकेपार विस्तार करणारे पेशवेही पुण्यातलेच. राज्याच्या इतिहासात सर्वाधिक वाटा कोणत्या जिल्ह्याचा असेल तर तो पुणे जिल्ह्याचा. पुण्याला शिक्षणाची पंढरी असेही म्हटले जाते. देशभरातून हजारो विद्यार्थी दरवर्षी शिकण्यासाठी पुण्यात येतात. त्यामुळे पुणे हे तरुणाईने नेहमीच गजबजलेले असते. अशा या गुणसंपन्न पुण्याला गेल्या काही महिन्यांपासून दृष्ट लागली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
२०२० मध्ये अमली पदार्थ विक्री प्रकरणात, ललित पाटील याला अटक करण्यात आली होती. ललित पाटीलकडून १६ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. पुण्यातील चाकण भागात अमली पदार्थांची तस्करी करताना ललित पाटीलला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यानंतर ललितची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. पाटील स्वत: अमली पदार्थ तयार करत असल्याची माहिती पोलिसांनी त्यावेळी न्यायालयात दिली होती. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर त्याच्या साथीदारालाही सव्वा दोन कोटी किमतीच्या मेफेड्रोनसह अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहात असताना तेथील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने त्याने पोटाचा विकार झाल्याचा बनाव रचला आणि ससून रुग्णालयात दाखल झाला. ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्याने रुग्णालयातून अमली पदार्थांचे रॅकेट चालवायला सुरुवात केली. पहाऱ्याला असलेल्या पोलिसांना हाताशी धरून त्याने २ ऑक्टोबरला रुग्णालयातून पळ काढला. याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या डीनपासून अनेक वैद्यकीय अधिकारी, पोलीस आणि तुरुंगातील कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे. या रॅकेटचे धागेदोरे अंडरवर्ल्डपासून तर थेट मंत्री-संत्रीपर्यंत जाऊन पोहोचले होते. भावासोबत मिळून ललितने अमली पदार्थ विकून कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली होती.
ललित पाटील प्रकरण काहीसे शांत होत असतानाच ६ दिवसांपूर्वी पुण्यातील दोन ठिकाणी दोन दिवसांत मिळून सुमारे अकराशे कोटींचे मेफेड्रोन सापडले. पुण्यातील विश्रांतवाडीतील एका लोकवस्तीतीतील मिठाच्या पाकिटांच्या गोदामातून पुणे पोलिसांनी १०० किलो मेफेड्रोन जप्त केले तर कुरकुंभ एमआयडीसीत छापा मारून एका कारखान्यातून ५५० किलो मेफेड्रोन ताब्यात घेतले. या दोन्ही मुद्देमालाची किंमत खुल्या बाजारात सुमारे अकराशे कोटी इतकी आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी सांगली आणि दिल्ली येथे जाऊनही अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. गेल्या आठ दिवसांत पोलिसांनी देशात विविध भागांत छापेमारी करत सुमारे ९७० किलो अमली पदार्थ आतापर्यंत जप्त केले आहे. या रॅकेटमध्ये एका नायजेरियन नागरिकाचाही सहभाग आहे, त्यामुळे या रॅकेटचे विदेशी कनेक्शन असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून याबद्दल पुणे पोलिसांचे सर्वत्र अभिंनदन केले जात आहे.
पुण्यातून एकामागोमाग एक जप्त केले जात असलेले अमली पदार्थांचे साठे आणि उघड असलेले त्यामागील रॅकेट्स यातून पुण्याला अंमली पदार्थांचा फार मोठा विळखा पडला आहे हे स्पष्ट होते. काही वर्षांपूर्वी असाच विळखा पंजाबलाही पडला होता. ज्यामध्ये कितीतरी महाविद्यालयीन तरुण-तरुणी नशेच्या आहारी जाऊन बळी पडले होते. कित्येकांचे संसार उध्वस्त झाले होते. कित्येकांच्या घरातील पुढची अख्खी पिढी नष्ट झाली होती. तेव्हापासून पंजाबला ‘उडता पंजाब’ असे म्हटले जाऊ लागले. या संपूर्ण प्रकरणाची भयावहता दर्शवणारा एक चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. चिमूटभर अमली पदार्थाची नशा सर्वकाही विसरायला लावते. नशेची ‘किक’ लागली की ना अभ्यासाची चिंता राहते, ना घरच्यांचे भय आणि ना भविष्याची काळजी. त्यामळे तरुणाईमध्ये या नशेचा प्रचार झपाट्याने होतो. गेल्या काही वर्षांत सांस्कृतिक पुणे शहरांत डिस्को बार आणि पब्सची संख्या कमालीची वाढली आहे. या पब्समध्ये तरुणांना अमली पदार्थ पुरवणाऱ्या टोळ्याही कार्यरत असतात. हे अमली पदार्थ अत्यंत महाग असतात त्यामुळे यामध्ये श्रीमंतांची मुले अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. ही मुले आपल्या अन्य मित्रमंडळींनाही याची चटक लावतात. एकदा नशा केली की सर्व काही विसरायला होत असल्याने तरुणांना काही दिवसांतच याचे व्यसन लागते. एकदा व्यसन लागले की वेळेत अमली पदार्थ न मिळाल्यास या नशेखोरांचा जीव कासावीस होतो. अमली पदार्थ मिळवण्यासाठी ही मंडळी कोणत्याही थराला जातात, पालकांशी खोटे बोलतात, घरी चोऱ्या करतात, यापैकी काहीच करायला जमले नाही, तर इतरांना लुटायलाही ही मंडळी मागेपुढे पाहत नाहीत. हे अमली पदार्थ नशा करणाऱ्याच्या मेंदूवर भयंकर परिणाम करतात. ज्यामुळे नशेची तलप आली की नशा करणारे वेडेपिसे होतात, त्यावेळी त्यांना दुसरे काहीच सुचत नाही. त्यावेळी अमली पदार्थ देण्याच्या मोबदल्यात कुणाच्या घरी दरोडा घालण्यास सांगितले तरी ही मंडळी मागेपुढे पहात नाहीत. त्यामुळे अमली पदार्थाच्या मोबदल्यात या तरुणांकडून तस्करी, अपहरण, हत्या यांसारखे भयंकर गुन्हे करून घेणाऱ्या टोळ्याही समाजात कार्यरत असतात. नशेखोरीच्या या विळख्यात दुर्दैवानेही आता मुलीही मोठ्या प्रमाणात सापडू लागल्या आहेत.
गेल्या काही वर्षांत प्रदर्शित झालेल्या काही हिंदी चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील वेब सिरींमधून खलनायकाला पडद्यावर अमली पदार्थांचे सेवन करताना दाखवण्यात आले आहे, अमली पदार्थाचे सेवन केल्यावर काही क्षणातच त्या खलनायकात एक विलक्षण शक्ती निर्माण होते आणि त्या शक्तीच्या बळावर तो भयंकर विध्वंस करू लागतो अशा प्रकारचे चित्रण म्हणजे अमली पदार्थाची एक प्रकारे जाहिरातच म्हणावे लागेल. अधिक बळ मिळवायचे असेल तर व्यायामादि शक्तीची उपासना करण्याची गरज नाही केवळ चिमूटभर अमली पदार्थ आपल्याला अपरिमित शक्ती बहाल कर शकते हा संदेश अशा प्रकारच्या दृश्यांमधून तरुणांमध्ये जात असल्याने तेही तशा प्रकारचा प्रयत्न करू पाहतात. बलात्कार, खून यांसारख्या गुन्ह्यांमध्ये अधिकांश गुन्हेगार अमली पदार्थाचे सेवन करून गुन्हा करतात असेही निरीक्षणातून सिद्ध झाले आहे.
पुण्यासारख्या सांस्कृतिक जिल्ह्यला ड्रग्जचा पडलेला विळखा पुण्याच्या भावी पिढीसाठी अत्यंत धोकादायक आहे. पुण्यातून कोट्यवधींचे अमली पदार्थ शोधण्यात पुणे पोलिसांना यश आले असले, तरी आतापर्यंत किती प्रमाणात अमली पदार्थ पुण्यात पसरवले गेले आहे याचे उत्तर कोणाकडेच नाही. आज रमेश परदेशी यांना साताऱ्यातून शिकण्यासाठी पुण्यात आलेल्या दोन मुली टेकडीवर अमली पदार्थाच्या नशेत झिंगताना दिसल्या. उद्या कदाचित आपली मुलेही अशा प्रकारे कुठेतरी झिंगताना सापडू शकतात. देशाचे भवितव्य घडवणारी पिढीच अशी नशेच्या आहारी जाऊन आपला नाश ओढवून घेऊ लागली, तर आर्थिक महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशाचे भवितव्य काय असेल ? त्यामुळे आता सर्वात मोठी जबादारी ही आज पालकांची आहे. आपली पौगंडावस्थेतील आणि तरुण मुले मुली बाहेर मित्र मैत्रिणींसोबत जाऊन काय उद्योग करतात, घरी वेळेत येतात का, पालकांकडे किंवा नातेवाईकांकडे अधिक पैशांची मागणी करतात का, घरी त्यांच्या वागण्यात काही बदल झालेला नाही ना, याकडे पालकांना अधिक लक्ष द्यावे लागेल. मुलांना दिली जाणारी अधिक मोकळीक हेही मुलांचे नशेखोरीला बळी पडण्याचे एक कारण आहे. यामुळे आपली मुले अमली पदार्थाच्या विळख्यापासून वाचवायची असतील, तर त्यांना वेळ देणे, त्यांच्याशी सुसंवाद साधने आणि त्यांच्यावर लक्ष देणे आदी कामे पालकांना करावी लागतील.
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०



