लोकसभा निवडणुकांचे २ टप्पे पार पडले असले, तरी अनेक ठिकाणच्या निवडणूका अद्याप शेष असल्याने प्रचाराला आता अधिक गती येऊ लागली आहे. सर्वच पक्षातील नेतेमंडळी आजमितीला रस्त्यावर उतरून प्रचाराला लागली आहेत, मोठमोठ्या रॅली निघत आहेत, हजारोंच्या सभा घेतल्या आहेत. खाणे-पिणे, विश्रांती या सर्वांकडे दुर्लक्ष करून आज प्रत्येक राजकीय नेता जीवघेण्या उन्हातही प्रचारासाठी राब राब राबतो आहे. सोबत कार्यकर्त्यांचा फौजफाटाही तितक्याच प्रमाणात झिजतो आहे. समस्त भारतभूमीला आज रणांगणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
युद्धात ज्याप्रमाणे रथी शत्रुपक्षातील रथीशी आणि महारथी महारथीसोबत लढतो त्याप्रमाणे पक्षाची वरिष्ठ मंडळी अन्य पक्षांच्या वरिष्ठांना लक्ष करत आहेत तर राज्य स्तरावरील मंडळी समोरील पक्षाच्या राज्यस्तरावरील प्रमुखाला टीकेचा धनी करत आहेत. एकमेकांची उणीधुणी काढताना अनेक जण पातळ्या ओलांडत आहेत. गेल्या दोन वर्षांत राज्यातील राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाल्याने कधीकाळी एखाद्यावर विश्वास टाकून खाजगीत सांगितलेल्या गोष्टी आज प्रचारसभांतून चव्हाट्यावर मांडल्या जात आहेत.
सत्तेत आल्यावर आम्ही नागरिकांसाठी काय काय करू हे सांगण्यापेक्षा समोरच्या पक्षातील मंडळी किती भ्रष्ट आणि खोटारडी आहेत याबाबतच्या गोष्टी रंगवून सांगण्यामध्ये राजकीय नेत्यांना यावेळी अधिक स्वारस्य जाणवते आहे. सर्वच पक्षांच्या सभांमध्ये आज हेच चित्र दिसून येत आहे. टीका करताना अनेक नेतेमंडळी शत्रुपक्षाच्या नेतेमंडळींच्या खासगी आयुष्यातील घटनांनाही विनाकारण उगाळताना दिसून येत आहेत. एकाने टीका केली म्हणून त्याला उत्तर देण्यासाठी समोरील पक्षाचा नेताही तितकीच जहरी टीका करण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी या वाकयुद्धामुळे निर्माण झालेल्या भडक्यात तेल ओतण्याचे काम करत आहेत.
अनेक ठिकाणी सभांमध्ये व्यासपीठावर आणि प्रेक्षकांमध्ये महिलावर्ग उपस्थित आहे याचेही भान नेतेमंडळींना राहिलेले दिसत नाही. जो नेता गेल्या लोकसभा निवडणुकीत एका पक्षाचा प्रचार करत होता तोच नेता यंदा जाहीर सभांतून त्याच पक्षाचे वाभाडे काढताना दिसतो आहे. अशा पक्षबदलू मंडळींच्या जुन्या ध्वनिचित्रफिती निवडणुकांच्या काळातच सामाजिक माध्यमांतुन व्हायरल केल्या गेल्याने त्या पाहणाऱ्यांचे चांगलेच मनोरंजन घडत आहे.
सामान्य जनतेला निवडणुकांच्या माध्यमातून देशाला योग्य नेतृत्व द्यायचे आहे आणि आपल्या विभागाची काळजी घेणारा, लोकांच्या हाकेला धावून येणारा, विभागातील जनतेची कामे करणारा, जनतेच्या समस्या सोडवणारा, विभागाचा विकास घडवून आणणारा, आपल्या मतदानक्षेत्राशी कृतज्ञतेने वागणारा खासदार निवडायचा आहे. जनता सुज्ञ असल्याने ती योग्य तो निर्णय घेऊन आपल्या विभागातून योग्य उमेदवार निवडून आणणारच आहे.
राजकीय सभांतून केल्या जाणाऱ्या टीकाटिपणीशी, आरोप प्रत्यारोपांशी सामान्य जनतेला काहीच देणेघेणे नाही तरीही राजकीय पक्ष इतरांची उणीधुणी काढण्यात अधिक स्वारस्य का दाखवत आहेत ? राज्याच्याच राजकारणाचा विचार केल्यास गेल्या वीस वर्षांत राज्यातील जनतेने सर्वच राजकीय पक्षांना राज्याची सत्ता चाखण्याची संधी दिली आहे, त्यामुळे कोणाची किती पात्रता आहे.
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०