… तर शेतकऱ्यांबरोबर मलाही तुरुंगात टाका | रोहित पाटील आक्रमक : पोलीस ठाण्यात तीन तास ठिय्या

0
10
तासगाव : सावळज, सिद्धेवाडी व परिसरातील शेतकऱ्यांनी पाहण्यासाठी आंदोलन केले आहे. शेतकरी म्हणजे गुन्हेगार नाहीत. पाण्यासाठी आंदोलन केल्यावर गुन्हे दाखल होत असतील तर यापुढे कोणीच पाण्यासाठी आंदोलन करणार नाही. जर शेतकऱ्यांवर आंदोलन केले म्हणून गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा. शेतकऱ्यांबरोबर मलाही तुरुंगात टाका, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी घेतली. जोपर्यंत ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना सोडत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नाही, असे सांगत पाटील यांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या केबिनमध्ये सुमारे तीन तास ठिय्या मारला.शनिवारी विसापूर योजनेचे पाणी सावळज भागात सोडण्यात आले होते.

 

मात्र काही तासातच हे पाणी बंद करण्यात आले. एका नेत्याच्या सांगण्यावरून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी बंद करण्याचे पाप केले आहे, असा आरोप करून शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्यावर आज रास्ता रोको केला. सुमारे दोन तासाहून अधिक काळ हा रस्ता रोको चालला. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत गेली. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून अनेक आंदोलकांना जबरदस्तीने ताब्यात घेतले. या आंदोलकांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.पोलिसांची ही दडपशाही कानावर येतात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी तातडीने तासगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली.

 

या ठिकाणी पाटील यांनी आंदोलन शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या केबिनमध्ये रोहित पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला.शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन केले आहे. सावळज भागात पाण्याची भीषण टंचाई आहे. पिण्यासही पाणी नाही. पाटबंधारे विभागाकडे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पाण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. अनेक निवेदने दिली आहेत. मात्र, या विभागाकडून वंचित गावांना पाणी देण्याचे नियोजन केले जात नाही.

 

त्यामुळे स्वाभाविकपणे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे. रास्ता रोको करणारे शेतकरी गुन्हेगार नाहीत. त्यांनी त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. मात्र पोलिसांनी कायद्यावर बोट ठेवून या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेऊ नये. शेतकऱ्यांवर जर अशा प्रकारे गुन्हे दाखल होऊ लागले तर यापुढे कोणी आंदोलन करायचे की नाही, असा प्रश्न उपस्थित होईल’,अशी भूमिका मांडत रोहित पाटील यांनी शेतकऱ्यांना केवळ नोटीस देऊन सोडण्यात यावे, अशी मागणी केली.मात्र पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दोन तासांहून अधिक काळ रास्ता रोको झाला आहे.

 

सामान्य लोकांना या रास्ता रोकोमुळे नाहक त्रास सहन करावा लागला आहे. या रास्ता रोकोची माहिती वरिष्ठांपर्यंत गेली आहे. त्यामुळे माझा नाईलाज आहे. मला आंदोलकांवरती गुन्हे दाखल करावेच लागतील, अशी भूमिका घेतली.त्यामुळे संतप्त झालेल्या रोहित पाटील यांनी पाण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकऱ्यांवर जर गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा. शेतकऱ्यांबरोबर मलाही तुरुंगात टाका, अशी आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनी रोहित पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहित पाटील आपल्या भूमिकेवर ठाम होते.
शेतकऱ्यांना केवळ नोटीस देऊन सोडा. जर त्यांच्यावर गुन्हेच दाखल करणार असाल तर त्यांच्यासोबत माझ्यावरही गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. या मागणीसाठी सुमारे तीन तास पाटील यांनी पोलीस निरीक्षक वाघ यांच्या केबिनमध्ये ठिय्या मारला.त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, शहराध्यक्ष ऍड. गजानन खुजट, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here