तासगाव पोलिसांच्या शेतकऱ्यांवरील कारवाईचा निषेध | संदीप गिड्डे : आंदोलन हाताळण्यात पोलीस अपयशी

0
तासगाव : सावळज व सिद्धेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाटीवर संविधानिक पद्धतीने आंदोलन केले होते. आजपर्यंत अनेक ठिकाणी रास्ता रोको झाले आहेत. सगळ्याच ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची भूमिका कधीच घेतली नाही. मात्र जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी रास्ता रोको केला म्हणून त्यांच्यावर तासगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले. भाजप किसान मोर्चाच्या वतीने मी तासगाव पोलिसांच्या या कृतीचा निषेध करतो, असे मत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांनी व्यक्त केले. शिवाय हे आंदोलन हाताळण्यात पोलीस अपयशी ठरले, असेही गिड्डे म्हणाले.
      ते म्हणाले, सावळज भागात पाण्याची भीषण टंचाई आहे. या भागाला शेती व पिण्यासाठी पाणी मिळणे आवश्यक आहे. मात्र पाटबंधारे विभाग या भागाला पाणी देण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज बिरणवाडी फाटा येथे संविधानिक पद्धतीने आंदोलन केले. या ठिकाणी रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी हे आंदोलन योग्य पद्धतीने हाताळायला हवे होते. आंदोलक व पाटबंधारे विभागांमध्ये समन्वय घडवून आणायला हवा होता. पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आंदोलन स्थळी कसे येतील, याचे नियोजन करायला हवे होते. मात्र पोलिसांनी आंदोलकांवर दंडुकेशाही करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.
       हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. पोलीस जर आंदोलक शेतकऱ्यांशी अशा पद्धतीने वागत असतील तर हे अत्यंत चुकीचे आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याला कोणीही वाली उरला नाही. त्यामुळे आपल्या न्याय व हक्कासाठी शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. पाण्यासाठी आंदोलन करणारे शेतकरी गुन्हेगार नाहीत. हे शेतकरी म्हणजे नक्षलवादी नाहीत. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत.
      गिड्डे म्हणाले, पोलिसांची कृती निषेधार्ह आहे. भाजप किसान मोर्चाच्या वतीने तासगाव पोलिसांचा मी निषेध करतो. पोलिसांच्या आततायीपणामुळे हे आंदोलन चिघळले. पोलिसांनी जर हे आंदोलन योग्य पद्धतीने हाताळले असते तर ही परिस्थितीच उद्भवली नसती पोलिसांनी शेतकऱ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली त्यांची ही दंडुकेशाही खपवून घेतली जाणार नाही.
      मूळात कोणतेही आंदोलन प्रशासन व संबंधित विभागाने हाताळायला हवे. मात्र या आंदोलनात तहसिलदार किंवा पाटबंधारे विभाग कुठेच दिसला नाही. आंदोलनात चर्चा पोलिसांनी करायची गरज नाही. आंदोलकानी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास प्रतिबंधात्मक कारवाई करणे पोलिसांचे काम आहे,असेही गिड्डे म्हणाले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.