तासगाव पोलीस निरीक्षकांमधील ‘वाघ’ जागा झाला

0
9

काय करायचे आहे ते करा : मी जर चुकीचे करत असेल तर माझी तक्रार वरिष्ठांकडे करा : मी पोलीस स्टेशनचा सातबारा घेऊन आलो नाही : आंदोलकांना सुनावले*

तासगाव : ‘मी जर काही चुकीचे करत असेल तर माझी तक्रार वरिष्ठांकडे करा. मी काय तासगाव पोलीस स्टेशनचा सातबारा घेऊन आलो नाही. तुम्हाला काय करायचे आहे ते करा’, असा गर्भित इशारा देत तासगावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी रस्त्यावर बसलेल्या आंदोलकांना खडे बोल सुनावले. तर प्रचंड राजकीय दबाव असतानाही तो झुगारून लावत नियमाप्रमाणे आंदोलकांवर गुन्हेही दाखल केले. त्यामुळे पोलीस निरीक्षकांमधील ‘वाघ’ जागा झाल्याचे बोलले जात आहे.

 

 

रविवारी सावळज, सिद्धेवाडीसह परिसरातील शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर बसले. बिरणवाडी फाटा येथे या शेतकऱ्यांनी सुमारे दोन तास रास्ता रोको केला. पोलिसांनी आंदोलकांना समजावून सांगत रास्ता रोको थांबवण्याची विनंती केली. मात्र आंदोलकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने रास्ता रोको थांबला नाही. परिणामी पोलिसांना आक्रमक भूमिका घ्यावी लागली. पोलिसांना नाइलाजास्तव बळाचा वापर करावा लागला. आंदोलकांची धरपकड केली. अनेक आंदोलकांना जबरदस्तीने ताब्यात घ्यावे लागले.

 

आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर सुमारे दोन तास विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली. दरम्यान, आंदोलक व पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. शेतकऱ्यांनी ‘आम्ही पाण्यासाठी रस्त्यावर बसलोय. आम्ही गुन्हेगार नाही. पोलीस दारू, मटका व जुगारवाल्यांवर कारवाई करत नाहीत. शेतकऱ्यांवर कारवाई करताना मात्र तत्परता दाखवली जाते’, असे म्हणत पोलिसांबद्दल रोष व्यक्त केला. यातूनच बाचाबाची वाढत गेली.

 

यावेळी पोलीस निरीक्षक वाघ यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. ‘आपण दोन तास रास्ता रोको केला आहे. आपल्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचल्या आहेत. आता प्रशासनाला आपल्या प्रश्नासंदर्भात मार्ग काढण्यासाठी वेळ द्या. रास्ता रोको केला म्हणजे लगेच प्रश्न मिटत नाही. प्रशासनाकडे जादूची कांडी नाही. तुमच्या रास्ता रोकोमुळे सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास होत आहे. कायद्याप्रमाणे रास्ता रोकोला परवानगी मिळत नाही. आपण केलेला रास्ता रोको बेकायदेशीर आहे’, असे सांगत आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला.

 

मात्र आंदोलक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे आंदोलक व पोलीस निरीक्षक वाघ यांच्यातील शाब्दिक बाचाबाची वाढत गेली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन पोलीस गाडीत कोंबले. यावरूनच पोलीस व आंदोलकांमध्ये जोरदार झटापट व खडाजंगी झाली. यावेळी पोलीस निरीक्षक वाघ यांचे रौद्ररूप सर्वांनाच पहायला मिळाले. वाघ यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता सर्वांना कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तंबी दिली.

 

यावेळी आंदोलक उलट – सुलट बोलत असताना पोलीस निरीक्षक वाघ चांगलेच चिडले. त्यांच्यातील ‘वाघ’ जागा झाला. त्यानंतर त्यांनी आंदोलकांना उद्देशून ‘मी जर चुकीचे करत असेल तर माझी तक्रार वरिष्ठांकडे करा. मी तासगाव पोलीस ठाण्याचा सातबारा घेऊन आलो नाही. तुम्हाला काय करायचे आहे ते करा’, अशा शब्दात आंदोलकांना खडे बोल सुनावले. त्यानंतर आंदोलनातील प्रमुखांना ताब्यात घेऊन तासगाव पोलीस ठाण्यात आणले.

 

या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल झाले. त्यांनी पोलीस निरीक्षक वाघ व पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांची भेट घेऊन आंदोलकांना केवळ नोटीस देऊन सोडण्यात यावे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नयेत. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन केले आहे. ते गुन्हेगार नाहीत. जर शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असाल तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा. शेतकऱ्यांबरोबर मलाही तुरुंगात टाका, अशी मागणी केली. सुमारे तीन तास पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये ठिय्या मारला.पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस निरीक्षक वाघ यांनी राजकीय दबावाला केराची टोपली दाखवली.

 

शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे. शेतकऱ्यांना पाणी मिळालेच पाहिजे. मात्र आंदोलनाचे टप्पे असतात. अचानक ‘शॉर्ट नोटीस’वरती रास्ता रोको करणे योग्य नाही. आपल्या मागण्यांसाठी सामान्य लोकांना नाहक त्रास देणे चुकीचे आहे, असे सांगत नियमाप्रमाणे आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हे दाखल होणारच, अशी ठाम भूमिका घेतली. त्यानंतर रोहित पाटील यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावले. मात्र कोणीही रोहित पाटील यांचे ऐकले नाही. पोलीस निरीक्षक वाघ यांनी शेवटी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ज्या आंदोलकांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.

 

या सर्व प्रकरणात पोलीस निरीक्षक वाघ यांनी घेतलेली ‘खमक्या’ भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. जर कोणी चुकीचे वागत असेल आणि त्याठिकाणी कोणाचाही राजकीय दबाव आला तर त्याला भीक घालणार नाही, अशीच वाघ यांची कालची भूमिका होती. त्यामुळे कालच्या प्रकरणात पोलीस निरीक्षकांमधील ‘वाघ’ जागा झाल्याची चर्चा तासगाव तालुक्यात सुरू झाले आहे. वाघ यांनी यापुढील काळातही कोणाचाही राजकीय दबाव न घेता कायद्याप्रमाणे काम करावे, अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.

 

काळ्या धंद्यांवर कारवाई करताना ‘वाघा’ची ‘शेळी’ व्हायला नको : सामान्य लोकांची अपेक्षा

जर कोणी कायदा हातात घेतला तर त्याची गय केली जाणार नाही. कायदा सर्वांना सारखा आहे, अशी रोखठोक भूमिका घेत पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी काल रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. रोहित पाटील यांच्या राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे पोलीस निरीक्षकांमधील ‘वाघ’ जागा झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

मात्र तासगाव तालुक्यातील गावागावात, गल्लीबोळात काळे धंदे सुरू आहेत. मटका, जुगार, गांजा, दारूची विक्री यासह अन्य काळ्या धंद्यांना उधाण आले आहे. पोलिसांचे खिसे गरम करून विनासायास हे धंदे सुरू आहेत. त्यामुळे या काळ्या धंद्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी. शेतकऱ्यांवर कारवाई करताना जी तत्परता दाखवली तीच तत्परता अवैध धंद्यांवर कारवाई करतानाही दाखवावी. काळ्या धंद्यांवर कारवाई करताना पोलीस निरीक्षकांमधील ‘वाघा’ची ‘शेळी’ होऊ नये, एवढीच माफक अपेक्षा सामान्य लोकांमधून व्यक्त होत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here