विकास डावरे यांना मिरज विधानसभा लढवण्यासाठी 50 हजारांची देणगी
रवी (शेठ) चव्हाण यांचे दातृत्व : सुशिक्षित तरुणाला विधानसभेत पाठवण्यासाठी हातभार
तासगाव : तासगाव तालुक्यातील तुरचीचे सरपंच विकास डावरे यांना मिरज विधानसभा मतदारसंघातून लढवण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी तुरची येथील रवी (शेठ) चव्हाण यांनी डावरे यांना 50 हजार रुपयांची देणगी दिली आहे. डावरे यांच्यासारखा एक सुशिक्षित, होतकरू, समाजकार्याची तळमळ असणारा चेहरा विधानसभेत पाठवण्यासाठी आपण हातभार लावत आहोत, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.
रवीशेठ चव्हाण यांच्या मते, विकास डावरे यांनी तुरची येथे अतिशय उठावदार काम केले आहे. उच्चशिक्षित असतानाही आपली नोकरी सोडून केवळ गावची सेवा करण्यासाठी त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. तुरचीचे सरपंच पद मिळवले. सरपंच पदाचा उपयोग गावातील सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी, शोषित, वंचित घटकांना व्हावा, यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. गावातील विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते.
विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळत नसल्याने त्यांनी तुरची ते तासगाव बस स्थानक असा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवण्याची त्यांची भूमिका असते. येरळा नदी कोरडी पडली होती. येरळाकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. एकही लोकप्रतिनिधी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नव्हता. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. त्यामुळे संतप्त झालेल्या तुरचीचे सरपंच विकास डावरे यांनी अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
त्यांनी केलेल्या अर्धनग्न आंदोलनाची व्हिडिओ क्लिप राज्यभर ‘व्हायरल’ झाली. या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनाला येरळा नदीत पाणी सोडणे क्रमप्राप्त बनले. डावरे यांच्या आंदोलनानंतरच येरळेत मुबलक पाणी आले. त्यामुळे येरळाकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला.
गावातील व परिसरातील विविध समस्यांबाबत डावरे नेहमीच ‘ऍक्टिव्ह’ असतात. या समस्या सोडवण्यासाठी त्यांची अविरत धडपड सुरू असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातील व परिसरातील समस्यांना ते नेहमी वाचा फोडण्याचा प्रयत्न करतात. एक सुशिक्षित चेहरा स्वतःची नोकरी सोडून गावाकडे येत राजकारण करत होता, अशावेळी लोकांनीही डावरे यांना साथ दिली.
विकास डावरे यांच्या कामाने प्रभावित झालेल्या अनेकांनी एकत्रित येत त्यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या सरपंचाला लोकवर्गणीतून गाव घर बांधून देत असेल अशी राज्यातील ही पहिलीच घटना असावी. लोकवर्गणीतून सुरू असणारे डावरे यांचे घर प्रगतीपथावर आहे.
गावचे सुपुत्र रवीशेठ चव्हाण हे सोना चांदीच्या व्यवसायानिमित्त झारखंड येथे असतात. गेली अनेक वर्षे ते त्या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत. झारखंड सोना चांदी असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी विकास डावरे यांना आजपर्यंत अनेक वेळेला मदत केली आहे. त्यांच्या घराच्या कामावेळीही कोरा धनादेश देऊन तुम्हाला हवी तितकी रक्कम यावर टाका असे चव्हाण यांनी सांगितले होते.
दरम्यान मिरज मतदारसंघातून सुशिक्षित चेहरा विधानसभेवर पाठविण्याची चर्चा सुरू आहे. त्यासाठी विकास डावरे यांचे नाव चर्चेत आहे, असे चव्हाण यांचे म्हणणे आहे. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे विधानसभा लढणे सोपे नाही. त्यामुळे घरासाठी ज्याप्रमाणे लोकवर्गणी काढली, त्याप्रमाणेच डावरे यांना विधानसभा लढण्याससाठीही मदत करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी रवीशेठ चव्हाण यांनी डावरे यांना 50 हजार रुपयांची देणगी दिली आहे. डावरे यांच्यासाठी समाज बांधवांकडून तसेच परिसरातून मोठ्या प्रमाणावर वर्गणी गोळा करू. त्यांच्यासारखा सुशिक्षित चेहरा विधानसभेवर पाठवण्यासाठी हवे ते करू, असे मत रवीशेठ चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
*विकास डावरे यांना घर, गाडी, कपडे, मोबाईलही जनतेने दिला…!*
विकास डावरे यांच्यासारखा एक सुशिक्षित चेहरा आपली नोकरी सोडून गावकऱ्यांच्या सेवेसाठी आला. त्यांना तुरचीचे सरपंच पद मिळाले. मिळालेल्या पदाचा गावच्या भल्यासाठी उपयोग सुरू आहे. डावरे यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची. दोन वेळचे अन्न मिळवणेही मुश्किलीचे होते. अशा परिस्थितीत लोकसेवा करीत असताना लोकांनीही त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. गावकऱ्यांनी पुढाकार घेत लोक वर्गणीतून त्यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला. या घराचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. तर गाडी, मोबाईल, कपडे व अक्षरशः चप्पलही गावाने घेऊन दिले आहे. डावरे यांच्यावर गावकऱ्यांनी केलेले प्रेम अद्भुत आहे. एखाद्या सरपंचाला गावकऱ्यांकडून इतके प्रेम मिळावे, ही राज्यातील कदाचित पहिलीच घटना असावी.