तासगाव : तासगाव पालिकेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 2021 – 22 या सालाकरिता पाच कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला होता. मात्र हा निधी आजतागायत पालिकेला प्राप्त झाला नाही. मात्र तरीही या निधीच्या अनुषंगाने तासगाव शहरात कोट्यवधी रुपयांची कामे ठेकेदारांना करावयास लावली. निधी आला नसतानाही पालिका प्रशासनाने ठेकेदारांच्या नरड्यावर बसून ही कामे पूर्ण करून घेतली. मात्र गेली दोन-तीन वर्षे हा निधी न आल्याने ठेकेदारांचे कोट्यावधी रुपये या कामात अडकले आहेत.या कामाची बिले येथे दहा दिवसात मिळावीत, अन्यथा पालिकेसमोर उपोषण करणार असल्याचा इशारा ठेकेदारांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांना देण्यात आले आहे. यानिमित्ताने वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या निधीचा झोल चव्हाट्यावर आला आहे.
तासगाव पालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्राप्त होत असतो. 2021 – 22 या सालाकरिता सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला होता. हा निधी मिळणार असल्याने पालिका प्रशासनाने तासगाव शहरातील विविध विकासकामे नियोजित केली. या विकास कामांचे वाटप शहरातील ठेकेदारांना करण्यात आले.ठेकेदारांनीही हा निधी आल्यानंतर आपली बिले मिळतील, या आशेने शहरातील विविध कामे मार्गी लावली. पालिका प्रशासनाने अक्षरशः ठेकेदारांच्या नरड्यावर बसून ही कामे पूर्ण करून घेतली. गेल्या दोन वर्षात वैशिष्ट्यपूर्ण निधीतून धरलेल्या कामांपैकी कोट्यवधी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र कामे पूर्ण झाल्यानंतरही आजतागायत ठेकेदारांना ही बिले मिळाली नाहीत.
याबाबत पालिका प्रशासनाकडे चौकशी केली असता शासनाकडून 2021 – 22 चा वैशिष्ट्यपूर्ण निधी अद्याप प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र जर हा निधीच पालिका प्रशासनाकडे वर्ग झाला नव्हता तर कोट्यवधी रुपयांची विकासकामे ठेकेदारांना पूर्ण करावयास का लावली, असा सवाल उपस्थित होत आहे.याबाबत ठेकेदारांनी आज पालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांची भेट घेतली. पूर्ण झालेल्या विकास कामांची बिले तातडीने मिळावीत. येत्या दहा दिवसात ही बिले मिळाली नाहीत तर पालिकेसमोर उपोषण करू, असा इशारा ठेकेदारांनी दिला आहे.
मुख्याधिकारी पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गेल्या दोन वर्षांपासून पूर्ण झालेल्या विविध विकासकामांची अनामत रक्कम वेळेवर परत मिळाली नाही.शिवाय पूर्ण झालेल्या कामाची बिले, थर्ड पार्टीसाठी मागे ठेवलेली 10 टक्के रक्कमही दोन – दोन वर्षे मिळाली नाही. पालिका प्रशासनाला आमच्या बिलाकडे पाहण्यास वेळ नाही. यावेळी इंद्रजित चव्हाण, सुनील जाधव, अनिल कुत्ते, लखन पाटील, अजय पाटील, किरण जामदार, संजय लुगडे, उमेश गावडे, अमोल हुलवाने, राजू भंडारे, अनिल पवार, चंदू मिरजकर यांच्यासह ठेकेदार उपस्थित होते.