विधानसभेला अजितराव घोरपडे वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत

0

‘तासगाव – कवठेमहांकाळ’मधून राजवर्धन घोरपडे यांच्यासाठी चाचपणी : लोकसभेनंतर आत्मविश्वास दुणावला

तासगाव : (अमोल पाटील)लोकसभा निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला ‘लोकसभा तो झाकी है…, विधानसभा अभी बाकी है…’ असे पोस्टर झळकवून माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी खळबळ उडवून दिली होती. लोकसभा निवडणुकीत कवठेमहांकाळ तालुक्यातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना घोरपडे यांनी मताधिक्य मिळवून दिले आहे. त्यामुळे घोरपडे यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. परिणामी त्यांच्याकडून तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघात राजवर्धन घोरपडे यांच्यासाठी चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. येत्या विधानसभेला त्यांच्याकडून वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

 

तासगाव – कवठेमहांकाळ हा राष्ट्रवादीचा व पर्यायाने स्व. आर. आर. पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून पाटील यांनी अनेक वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांच्या विरोधात माजी खासदार संजय पाटील व माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनाही मतदारांनी धूळ चारली होती. आर. आर. पाटील यांच्या पश्चात आमदार सुमन पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आमदार पाटील यांच्या विरोधातही घोरपडे यांनी एक वेळा नशीब आजमावले. मात्र मतदारांनी त्यांना नाकारले होते.

 

तसं पाहिलं तर राष्ट्रवादी व स्व. आर. आर. पाटील कुटुंबीय हे संजय पाटील व अजितराव घोरपडे यांचे राजकीय विरोधक आहेत. मात्र संजय पाटील यांनी राष्ट्रवादीशी घरोबा करत सहा वर्षे विधान परिषद मिळवली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेत 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभेची उमेदवारी मिळवली. 2014 व 2019 या दोन्ही निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. या विजयात माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचा सिंहाचा वाटा होता.

मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तासगावात प्रचारास येऊनही अजितराव घोरपडे यांचा पराभव झाला होता. याठिकाणी आर. आर. पाटील निवडून आले होते. या निवडणुकीत संजय पाटील यांनी मनापासून आपले काम केले नाही. त्यांनी आपल्याशी दगाफटका केला, असा आरोप घोरपडे यांचा होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही घोरपडे यांनी आमदार सुमन पाटील यांच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीतही घोरपडे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Rate Card

2014 व 2019 च्या निवडणुकीत संजय पाटील व आर. आर. पाटील कुटुंबीयांमध्ये ‘सेटलमेंट’चे राजकारण होऊन आपला बळी दिला गेला आहे, अशी भावना घोरपडे यांची वाढीस लागली. परिणामी घोरपडे व संजय पाटील यांच्यामधील वितुष्ट वाढत गेले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांना भाजपमधून उमेदवारी मिळाली. तर काँग्रेसमधून उमेदवारी नाकारल्यानंतर विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला.

यावेळी संजय पाटील यांचा हिशोब चुकता करण्याची संधी आल्याचे सांगत अजितराव घोरपडे यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. कवठेमहांकाळ तालुका विशाल पाटील यांच्या पाठीशी उभा केला. कवठेमहांकाळ तालुक्यातील व मिरज मतदारसंघातील गावांमधून विशाल पाटील यांना मताधिक्य दिले. परिणामी तासगाव – कवठेमहांकाळ या ‘होमग्राउंड’वर संजय पाटील पिछाडीवर पडले. या निवडणुकीत संजय पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर विशाल पाटील सुमारे एक लाख मतांनी निवडून आले.

पाटील यांच्या विजयात घोरपडे यांचा सिंहाचा वाटा होता. दरम्यान, निवडणुकीच्या निकालाच्या पूर्वसंध्येला घोरपडे समर्थकांनी राजवर्धन घोरपडे यांचा फोटो झळकवत ‘लोकसभा तो झाकी है…, विधानसभा अभी बाकी है…’ असे पोस्टर लावले होते. या पोस्टरची मतदारसंघात प्रचंड चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत कवठेमहांकाळ तालुक्यातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मताधिक्य दिल्याने घोरपडे यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यांची राजकीय महत्त्वकांक्षा वाढीस लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राजवर्धन घोरपडे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा नशीब आजमावण्याची त्यांची तयारी असल्याचे दिसून येतेय.

येत्या विधानसभा निवडणुकीत घोरपडे वेगळी चूल मांडतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे ही निवडणूक नेमकी कशी होणार, राष्ट्रवादीच्या रोहित पाटील यांच्याविरोधात भाजपचा उमेदवार कोण असणार, याबरोबरच घोरपडे यांची नेमकी भूमिका कशी राहणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा कालच देणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.