जत: महाराष्ट्रात लिंगायत समाज अल्पसंख्यांक असला तरी जत विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. तरीही आजअखेर लिंगायत समाजाचा एकदाही आमदार झाला नाही. त्यामुळे यावेळी लिंगायत समाजालाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष व बसवसेनेचे संस्थापक अध्यक्ष बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
बसवराज पाटील म्हणाले की, जत विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. आजअखेर तालुक्यात 15 वेळा आमदार निवडून आले. त्यामध्ये मराठा समाज चार टर्म, धनगर समाज दोन टर्म, बौद्ध समाज सहा टर्म व चर्मकार समाज तीन टर्म असे आमदार झाले आहेत. मात्र ज्या समाजाची मतदार संख्या सर्वाधिक आहे त्या लिंगायत समाजाला एकदाही प्रतिनिधित्व मिळाले नाही.
महाराष्ट्र राज्यात लिंगायत समाज हा अल्पसंख्यांक असला तरी जतमध्ये सर्वाधिक लिंगायत समाजाचे मतदार आहेत. शेजारच्या अथणी व तिकोटा मतदारसंघातून लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे. मागील काही विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाला सक्षम नेतृत्व मिळाले नव्हते. मात्र यावेळी लिंगायत समाजातील दिग्गज नेते विधानसभेसाठी इच्छुक आहेत. जो पक्ष लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व देईल आम्ही त्या पक्षाच्या पाठीशी ठामपणे राहणार आहोत, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.