तासगाव : तासगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा उधळण करून अडते व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा सौदे बंद पाडून तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी दिला आहे. जिल्हा उपनिबंधक यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, तासगाव येथे होत असलेल्या बेदाणा सौद्यात शेतकऱ्यांच्या बेदाण्याची उधळण होत आहे. या उधळणीतून शेतकऱ्यांची अडत्यांकडून वर्षाकाठी सुमारे दहा कोटींची लुट केली जात आहे. वर्षाला सुमारे एक हजार टन बेदाण्याची उधळण होते. यातून अडत्यांचा कोट्यावधी रुपये कमवण्याचा कारभार चालू आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून तयार केलेला बेदाणा सौद्यामध्ये उधळून तो पायाखाली तुडवला जातो.
१५ किलोच्या बेदाणाच्या बॉक्समधून सरासरी ३ किलो बेदाण्याची उधळण केली जाते. सौद्यात हवा तो दर नाही मिळाला तर पुन्हा पुढच्या सौद्यावेळी अशीच मालाची उधळण केली जाते. संपूर्ण हंगामात सुमारे तीन ते चार हजार कलमांचा सौदा होतो. जितकी कलमे तितके बॉक्स फोडून मालाची उधळण होते. सौद्यानंतर खाली पडलेला बेदाणा अडतेच गोळा करातात. हंगामात एका सौद्यात सुमारे १०० टनापर्यंत उधळण केलेला बेदाणा खाली पडलेला असतो. वर्षभरात १२० ते १३० सौदे होतात वर्षाला तब्बल एक हजार टन बेदाण्याची उधळण होते. उधळण झालेला बेदाणा अडते स्वतः ताब्यात घेऊन, पॉलिश करून तो पुन्हा विकतात हा बेदाणा किमान १०० रु. प्रतिकिलो जरी विकला गेला, तरी सुमारे दहा कोटी पर्यंत फायदा अडत व्यापाऱ्यांचा होतो. दीपावळीमध्ये हा माल विकायला काढला जातो.
यातूनच कामगारांना बोनस, उचला दिल्या जातात. खुलेआम बेदाणा उत्पादकांची लुट होत असताना, बाजार समितीचे पदाधिकारी आणि प्रशासन सोयीस्कर कानाडोळा करत आहे. अशा प्रकारे बेसुमारपणे बेदाणा उत्पादकांची लुट होत आहे, याला आळा बसणे गरजेचे आहे.
बेदाणा मार्केटमध्ये शेतकऱ्यांना प्रक्रियेपासून ते विक्रीपर्यंत अडते, व्यापारी व खरेदीदारांची साखळी तयार झाली आहे. याच साखळीतून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. शेतकऱ्यांना ऍडव्हान्स दिलेल्या रक्कमेवर सावकारी पद्धतीने व्याज आकारले जात आहे. असे सर्व मिळून सुमारे दोनशे कोटींपेक्षा जास्त रक्कमा देऊन त्यावर दोन टक्के व्याजाची आकारणी करून रक्कम वसूल केली जाते. यातून शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची लुट व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. या साखळीमुळे जिल्ह्यातील बेदाणा उत्पादकांना चांगले दिवस येणे तर लांबच दिवसेंदिवस त्यांची परिस्थिती बिघडतच चालली आहे. तसेच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. याउलट शेतकऱ्यांच्या जीवावर या व्यापाऱ्यांची घरभरणी सुरु आहे.
या सर्व प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तासगांवमध्ये होणारे सौदे बंद पाडण्यात येतील, असा इशारा काळे यांनी दिला आहे.