जत : जत तालुक्यातील माडग्याळ येथे दाखल झालेले म्हैसाळचे पाणी व्हसपेठ, गुड्डापूर, अंकलगी तलाव येथे दाखल झालेच पाहिजे, सदरचे काम तातडीने सुरू करावे यासाठी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी संख येथे आमरण उपोषण व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तुकाराम बाबांच्या या आंदोलनाला, लढ्याला यश आले आले.
आपल्या उपोषणाची दखल शासनाने घेतली आहे.सदरचे काम आजच सुरू करत आहोत, काम करण्यासाठी मशिनही जागेवर आली असल्याचे सांगत म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती तुकाराम बाबा व आंदोलनकर्त्यांना केली. ठोस लेखी आश्वासन व मशिनरी जागेवर आल्याचे फोटो व व्हिडिओ अधिकाऱ्यांनी दाखवल्यानंतरच रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. संखमधील मुख्य चौकातच रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने रत्याच्या तिन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.
आंदोलनात तुकाराम बाबा, अंकलगीचे माजी सरपंच मोहन गायकवाड, सोर्डीचे सरपंच तानाजी पाटील, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ, डॉ. रविकिरण म्हेत्री महातेश स्वामी, सलीम अपराध, बसवराज बिराजदार, गगय्या स्वामी, महेश भोसले, चनप्पा आवटी, नारायण कोरे, संजय हदीमणी, संतोष पाटील, अनिल उदगेरी, महेश सूर्यवंशी, उमराणी, बिराण्णा कोहळळी, कन्याकुमार हत्ताळी, प्रशांत भगरे, सचिन कुकडे, शिवलिंगप्पा तेली, काशीराया रेबगौंड यांच्यासह बागडेबाबा मानव मित्र व पाणी संघर्ष समितीचे सदस्य मोठया संख्येने सहभागी झाले होते.
★ आंदोलनाने वेधले लक्ष
सकाळी अकरा वाजता संख येथील मुख्य चौकात आंदोलन सुरू झाले. उपस्थितांनी पाण्यासाठी शासन व प्रशासन परीक्षा बघत असल्याचे सांगत सडकून टिका केली. प्रत्यक्षात रस्ता रोको सुरू झाल्यानंतर पोलिसांनी रस्ता रोको न करण्याचे आवाहन केले पण तुकाराम बाबांनी जोपर्यत काम सुरू करण्याची तारीख जाहीर केली जात नाही तोपर्यत रस्त्यावरून उठणार नाही हवे तर जेलमध्ये घाला, कारवाई करा अशी आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विनंती सरकारला कितीदा करावं, म्हैसाळ सहाव्या टप्प्याच्या पाणी द्या. का हो साहेब उशीर लाविला, पाण्यासाठी जीव वेडा झाला. हे गीत बाबा व आंदोलनकर्त्यांनी गात रक्त घ्या पण पाणी द्या अशी विनंतीकरत सरकारला पाणी देण्याचे आवाहन केले. सहा महिन्यांपूर्वी जानेवारीत अंकलगी येथे याच मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते.७५ हुन अधिक जणांनी रक्त घ्या पाणी द्या म्हणत रक्तदान केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहा महिन्यात काम करू असे लेखी पत्र दिले पण काम सुरू न केल्याने सोमवारी केलेल्या तीव्र आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
■ तुकाराम बाबांचे थेट आव्हान व पुन्हा आंदोलनाचा दिला इशारा
म्हैसाळच्या पाण्यासाठी मुंबई मंत्रालयापर्यत पायी दिंडी काढली. जत पूर्व भागातील माडग्याळ, व्हसपेठ, गुडडापूर, संख ते अंकलगी, बिसलसिद्धेशर ते कोळगिरी, कोळगिरी ते सोर्डी, शेडयाळ- दरीकोनूर ते दरीबडची येथे म्हैसाळचे पाणी यावे यासाठी सर्वात प्रथम आपण मागणी केली. पाणी मिळावे ही आपली भावना आहे पण यात काही मंडळी राजकारण करू पाहत आहे. राजकारण करू पाहणाऱ्यांनी जाहीरपणे किमान मागणीचे पत्र दाखवावे, मी ही आपला पाठपुरावा केलेले पत्र दाखवतो असे थेट आव्हान देत राज्यकर्त्यांनो पाण्यावरून राजकारण करू नका. ओंजळ कोणाचीही असो जत तालुक्यातील प्रत्येक गावात पाणी पोहचले पाहिजे यासाठी प्रयत्न करा असे आवाहन तुकाराम बाबांनी यावेळी केले.
म्हैसाळ योजनेतून व्हसपेठ,गुड्डापूर, अंकलगी तलावात पाणी सोडावे या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन प्रत्यक्षात काम सुरू होताच मागे घेण्यात आले.




