राजे रामराव महाविद्यालय नॅक पुनर्मूल्यांकनासाठी सज्ज | नॅक समिती घेणार 5 वर्षातील शैक्षणिक काम,उपक्रमांचा आढावा

0
6
जत : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे राजे रामराव महाविद्यालय, जतला बेंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद अर्थात नॅक समिती २५ व २६ जुलैला भेट देणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील व नॅक समन्वयक डॉ.शिवाजी कुलाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.अधिक माहिती देताना ते म्हणाले, या त्रिसदस्य समितीच्या प्रमुख म्हणुन कर्नाटक राज्यातील कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथील सामाजिक शास्त्र अधिष्ठाता व समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ.जयश्री शिवनंदा उपस्थित राहणार आहेत.समितीतील दुसरे सदस्य पश्चिम बंगाल येथील गौरबंगा विद्यापीठातील वाणिज्य शाखेचे प्राध्यापक डॉ.गौतम भौमिक तर समितीच्या तिसऱ्या सदस्या हैदराबाद येथील राजा बहादुर व्यंकट राम रेड्डी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या अच्युथ देवी जमुला उपस्थित राहणार आहेत.
 संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनातून स्वतंत्र प्रशासकीय कार्यालय, भव्य सभागृह नवीन इमारतीमध्ये तयार करण्यात आले आहे. महाविद्यालयात विज्ञान विभागासाठी स्वतंत्र सहा प्रयोगशाळा, वेगवेगळ्या विभाग प्रमुखांसाठी पंधरा केबिन, ग्रंथालयाचे संपूर्ण नूतनीकरण, स्वतंत्र रीडींग हॉल, स्वतंत्र नेट व रिसर्च सेंटर, उपहारगृह, मुलींसाठी दोन वस्तीगृहे, विश्रामिका, जिमखाना, बॅडमिंटन हाॅल, सुसज्ज ॲथलेटिक्स मैदान, फुटबाॅल मैदान तयार करण्यात आली आहेत. याचबरोबर जैवविविधता संवर्धनासाठी महाविद्यालयाने पुढाकार घेतला असून ४८२ विविध प्रजातींच्या वनस्पती, पन्नास पेक्षा जास्त पशुपक्षी परिसरात आढळतात.महाविद्यालयामध्ये सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये संस्थेच्या मा. पदाधिकारी यांनी सर्वोपरी मदत केल्यामूळेच अल्पवाधी मध्येच महाविद्यालय नॅकला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले असून चांगली ग्रेड मिळवण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी झटत आहेत.
यावेळी बोलताना नॅक समन्वयक डॉ. शिवाजी कुलाळ म्हणाले, राजे रामराव महाविद्यालय राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदच्या (नॅक) चौथ्या पर्वाला सामोरे जात आहे. यानिमित्ताने या परिषदेची त्रिसदस्य समिती महाविद्यालयातील सर्व अधिविभाग, विविध उपक्रम, माजी विद्यार्थी, पालक व आजी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. तसेच महाविद्यालयाने राबवलेल्या अभिनव उपक्रमांमध्ये मुक्तपीठ, एक तास ग्रंथालयात, महाविद्यालयातील जैवविविधतेचे संवर्धन, आजचे शब्द, मृदा व खडक संग्रहालय, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, महाविद्यालयाच्या परिसरात राहणारे विविध इत्यादींची पाहणी करून नामांकन देणार आहे.या पत्रकार परिषदेवेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here