पालकमंत्र्यांनी सांगली व मिरज येथे केली पूर परिस्थितीची पाहणी
सांगली : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यास कृष्णा नदीतील पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन दक्ष आहे. पूर परिस्थितीच्या अनुषंगाने शासन, प्रशासन ज्या सूचना देते त्याचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे. शासन, प्रशासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज आयर्विन पूल सांगली व कृष्णाघाट मिरज येथे पूर परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळ, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, सांगली अपर तहसिलदार अश्विनी वरूटे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, पूरबाधित नागरिकांच्यासाठी निवारा केंद्र, भोजन, आरोग्य सुविधा, जनावरांसाठी चारा, पाणी आदीची आवश्यकतेप्रमाणे सोय करण्यात येईल. नागरिकांनी काळजी करू नये, येणाऱ्या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करावा. अलमट्टी येथील पाणी विसर्ग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. नागरिकांनी पुराच्या पाण्यात जावू नये तसेच स्वत:सह कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.मिरज येथील नागरिकांनी शेतात जाण्यासाठी रस्ते व अन्य समस्या पालकमंत्र्यांच्या समोर मांडल्या, यावर त्यांनी त्यांच्या या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
मिरज, वाळवा, पलूस व शिराळा तालुक्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आज सुट्टी
सांगली: सांगली जिल्हयात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांगली जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या करिता जिल्हाधिकारी सांगली तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजा दयानिधी यांनी त्यांना प्राप्त अधिकारान्वये सांगली जिल्ह्यातील मिरज (सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह), वाळवा, पलूस व शिराळा या तालुक्यातील सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक, माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळा व महाविद्यालये (शासकीय, निमशासकीय, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित सर्व) तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापने वरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
तथापी या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत / विद्यालयात / महाविद्यालयात उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करण्याचे आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
शिराळा तालुक्यातील पुरस्थितीचे अनुशंगाने
पुढील गावातील कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थलांतरीत झाली आहेत
*१. काळुंद्रे*
कुटुंब संख्या 8
व्यक्तींची संख्या 44
पशुधन १६
*२. सोनवडे*
कुटुंब संख्या 1
व्यक्तींची संख्या 2
पशुधन 12
*3. चरण*
कुटुंब संख्या 1
व्यक्तींची संख्या 3
पशुधन 0
*4. नाठवडे*
कुटुंब संख्या 1
व्यक्तींची संख्या 2
पशुधन 4
*5. चिंचोली*
(निवारा केंद्र जि.प. शाळा चिंचोली)
कुटुंब संख्या 1
व्यक्तींची संख्या 6
पशुधन 42
वाळवा तालुक्यातील वारणा नदीकाठची पूरबाधित क्षेत्रातील खालील प्रमाणे गावातील कुटुंब पशुधनासह सुरक्षित स्थळी स्थलांतरित झालेली आहेत
*1) कणेगांव* मधील
एकूण कुटुंबे -20
लोकसंख्या – 60
पशुधन – 35
*2.भरतवाडी* मधील
पशुधन -15
पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारणे, सेल्फी काढण्यास मनाई
सांगली : चांदोली व कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे व सध्या पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नदी पात्रात वाढ झाल्याने पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरीक गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. आयर्विन पुलावरुन तसेच नदी काठावरील असणाऱ्या गावांमध्ये काही तरुण मुले व नागरीक पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारणे, स्टंटबाजी करून सेल्फी घेत असल्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 27 ठिकाणी व त्यापासुन 100 मिटर परिसरात पूर परिस्थिती सामान्य होईपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी भारतीय नागरीक संरक्षण संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार दिनांक 26 जुलै 2024 ते 6 ऑगस्ट 2024 या कालावधीसाठी पुढीलप्रमाणे मनाई आदेश जारी केला आहे.
संबंधित ठिकाणांच्या 100 मीटर परिसरात 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी विनाकारण जमण्यास फिरण्यास, वावरण्यास, उभा राहण्यास, पाणी पाहण्यासाठी जाण्यास तसेच फोटो सेशन करण्यास, व्हिडीओ ग्राफी करण्यास, रील्स बनविण्यासाठी जाण्यास मनाई केली आहे.
मनाई करण्यात आलेली पोलीस ठाणे हद्दितील ठिकाणे पुढीलप्रमाणे – सांगली शहर – आयर्विन पूल, सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट. सांगली ग्रामीण – हरिपूर – नदीघाट, कसबेडिग्रज – कृष्णा नदी पूल, कवठेपिरान – सातसय्यद दर्गा, माळवाडी – कुंभोज पूल, दुधगाव – खोची पूल. मिरज ग्रामीण – म्हैशाळ बंधारा. महात्मा गांधी चौक – कृष्णा घाट ते अर्जुनवाड पूल, कृष्णा घाट. मिरज शहर – म्हैशाळ रोड वांडरे कॉर्नर. आष्टा – शिरगाव बंधारा, शिगांव पूल, वाळवा (हाळभाग) ते कारंदवाडी रस्ता. इस्लामपूर – बहे पूल, ताकारी पूल. शिराळा – सागांव वारणा नदी पूल. कोकरूड – चरण पूल, आरळा पूल कोकरूड पूल. भिलवडी – भिलवडी पूल, औदुंबर मंदिर, आमणापूर पूल, नागठाणे बंधारा, सुखवाडी ते तुंग नवीन पूल. विटा – कमळापूर ते रामापूर जाणारा पूल.
हा आदेश दि. 26 जुलै 2024 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 6 ऑगस्ट 2024 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.