– जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली : संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन दक्ष आहे. सन 2019 व सन 2021 मधील पुराचा अनुभव पाहता, जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. सर्वांनी सतर्क रहावे. संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करताना जनतेने घाबरु नये. प्रशासनाशी संपर्कात रहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
पूर परिस्थिती उदभवल्यास आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे व जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येईल त्याकामी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. नदीपात्रापासून १०० मीटर परिसरामध्ये नागरिकांनी जाऊ नये फोटो, सेल्फी काढू नये. नदीपात्रावरील पूलावरून पाणी वाहत असल्यास अशा पुलावरून वाहने नेवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामूळे व सध्या पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामूळे नदीपात्रातील पाण्यात वाढ झाल्याने त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये या दृष्टीने भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे मनाई आदेश लागू केला आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सूरू असल्याने जिल्ह्यातील मिरज (सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपलिका क्षेत्रासह), वाळवा, पलूस व शिराळा या तालुक्यातील सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक, माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळा व महाविद्यालये (शासकिय, निमशासकीय, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित सर्व) तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दि. 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश जारी केले आहेत.