डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम : क्षेपणास्त्र प्रणालीचे जनक

0
11
भारताच्या क्षेपणास्त्र प्रणालीचे जनक,  जेष्ठ शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांची आज नववी पुण्यतिथी. १५ ऑक्टोबर १९३१ रोजी  तामिळनाडूतील रामेश्वरम येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकिर जैनूलाबदिन अब्दुल कलाम असे होते. अब्दुल कलाम यांचे वडील नावाडी होते. रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीने धनुष्यकोडीला नेण्याआणन्याचे काम ते करीत. अब्दुल कलाम शाळेत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने ते गावात वर्तमानपत्र विकू लागले. त्यांचे बालपण काबाडकष्ट करण्यातच गेले.  शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर ते उच्च शिक्षणासाठी तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले.  तेथे बीएससी झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांच्या बहिणीने दागिने  गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. भारतात आल्यावर त्यांनी सहा वर्ष डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम केले. १९६३ पासून ते  इसरो संस्थेत क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही ( सॅटेलाईट लॉंचिंग व्हेईकल ) संशोधनात भाग घेऊ लागले. पुढे ते या प्रकल्पाचे प्रमुख बनले. इसरोचे तत्कालीन प्रमुख विक्रम साराभाई हे अब्दुल कलाम यांच्या कार्याने प्रभावित झाले. विक्रम साराभाई व अब्दुल कलाम यांच्यात गुरू शिष्याचे नाते निर्माण  झाले.

 

 

विक्रम साराभाई यांनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ कलाम यांनी सांभाळावी असे वक्तव्य केले होते,  ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखवले. पुढे साराभाई यांचेच नाव दिलेल्या विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे ते प्रमुख बनले.  इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक  कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमाच्या प्रमुखपदी अब्दुल कलाम यांची नेमणूक करण्यात आली त्यामुळे ते पुन्हा डीआरडीओत दाखल झाले. तिथे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र तयार करण्याचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले. डीआरडीओत देशातील नामवंत शास्त्रज्ञांचा संच त्यांच्याकडे होता. वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असायचा. देशातील उत्तम शास्त्रज्ञांकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची कला त्यांच्याकडे होती. क्षेपणास्त्र विकास कार्यातील अग्नी या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रेक्षपण केल्यावर त्यांचे जगभर कौतूक झाले. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार बनले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करताना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रसुख म्हणून अर्जुन हा एम. बी. टी ( मेन बॅटल टॅंक ) रणगाडा व लाईट कॉबॅट एअरक्राफ्ट ( एलसीए ) यांच्या निर्मितीत महत्वाची भूमिका पार पाडली.
त्यांच्याच मार्गदर्शनाखाली १९९८ साली भारताने पोखरण येथे यशस्वी अणूचाचणी केली. विज्ञानाचे परमभोक्ता असणारे अब्दुल कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रविना वाजवण्याचा आणि मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण व १९९८ साली भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉ अब्दुल कलाम हे तरुणांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यावर डॉ कलाम यांनी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे काम केले. मोठी स्वप्ने पाहा आणि त्यासाठी  भरपूर कष्ट करा असे ते तरुणांना सांगत. देशातील तरुणांवर त्यांचा खूप विश्वास होता. आपल्या देशातील तरुणांमध्ये खूप ऊर्जा आहे या ऊर्जेचा योग्य वापर केला तर देश महासत्ता बनेल असे ते नेहमी म्हणत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. अग्निपंख, इंडिया २०-२०, इग्निटटेड माईंडस ही त्यांनी लिहिलेली पुस्तके खूप गाजली. अग्निपंख हे त्यांनी लिहिलेले पुस्तक बेस्ट सेलर ठरले. राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यावर डॉ कलाम विविध संस्थांमध्ये जाऊन व्याख्याने देत असत. २७ जुलै २०१५ रोजी तरुणांना व्याख्यान देत असतानाच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रात जी पोकळी निर्माण झाली ती कधीही भरून निघणार नाही. डॉ ए.पी. जे अब्दुल कलाम यांना पुण्यतिथीनिमित्ताने विनम्र अभिवादन!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here