काल पासून म्हणजे सोमवारपासून श्रावण महिना सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावण महिन्याचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावण महिन्यातील सोमवार हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. या दिवशी महादेवाची पूजा केली जाते. तसे श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा व व्रत करण्याची हिंदू व जैन धर्माची परंपरा आहे. श्रावण महिन्याला सणांचा महिना म्हंटले जाते. कारण श्रावण महिन्यातच सर्वात जास्त सण येतात. या महिन्यात व्रत वैकल्याची रेलचेल असते. श्रावण महिन्यात नाग पंचमी, रक्षा बंधन, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला, मंगळागौर, बैल पोळा हे सण येतात. त्यानंतर येणारे गौरी गणपतीही याच महिन्यात खुणावत असतात. नाग पंचमी पासून दसरा दिवाळी पर्यंत सगळ्या हव्या हव्याशा सणांची सुरुवात याच महिन्यापासून होते.
सणांच्या दिवशी गोडाधोडाचा बेत घराघरात असतो. श्रावणातील प्रत्येक दिवस सण होऊन जातो. अशा आनंदी वातावणामुळे असेल कदाचित पण श्रावणात मनाच्या सांदी कोपऱ्यात उत्साहाचे नवे ऋतू फुलत असतात. बहुतेक सगळ्या सणामध्ये आणि अंगिकारल्या जाणाऱ्या व्रत वैकल्यांमधून संकटातून निर्भिडपणे आणि यशस्वीपणे बाहेर येण्यासाठी शक्ती मिळवण्यासाठी प्रेरणा मिळते. संसारातील सर्व सुख दुःखाचा सारीपाट मांडला असताना मन मोकळं करून सख्याना समजून घेण्याचे हक्काचे क्षण हा महिना देऊन जातो. श्रावण महिना केवळ हिंदुंसाठीच नव्हे तर मुस्लिम आणि पारशी बांधवांसाठी ही पवित्र महिना मानला जातो कारण याच महिन्यात मुस्लिमांची बकरी ईद आणि पारशी बांधवांची पतेती हे सण येतात. त्यामुळे हिंदू प्रमाणेच जैन, मुस्लिम आणि पारशी बांधव श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. मुस्लिम आणि पारशी बांधव देखील त्यांचे सण उत्साहात आणि जल्लोषात साजरे करतात. श्रावण महिन्यात निसर्गाला उधाण आलेले असते. आषाढ महिन्यात झालेला पावसाने सर्वत्र हिरवळ दाटलेली असते. निसर्ग आषाढ सरी पिऊन हिरवे गालिचे पसरून बहरलेला असतो. हा हिरवा गालिचा पाहूनच
हिरवे हिरवेगार गालिचे
हरित तृणाच्या मखमालीवर….
ही कविता बालकवींना सुचली असावी. श्रावण महिन्यात सगळीकडे वसुंधरेवर श्रावणाच्या धारा बरसत असतात. श्रावणाच्या धारा बरसत असल्याने निसर्ग सौंदर्य तृप्तीचा हुंकार देत असतो. निसर्गाचे बहरलेले सौंदर्य पाहताच हासरा, नाचरा, लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला या ओळी ओठी गुणगुणावश्या वाटतात. श्रावण म्हणजे चैतन्य….. श्रावण म्हणजे उत्साह…..
श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरून उन पडे
या कवितेत बालकवींनी श्रावण महिन्याचे चित्रण यथार्थपणे मांडले आहे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५