जत : राज्यात राज्यात एकीकडे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना जत पूर्व भागातील नागरिकांना आजही टँकरचे पाणी प्यावे लागत आहे. त्याचबरोबर जनावरांचा पाणी,चाऱ्याचा प्रश्न मोठा गंभीर बनला आहे. नागरिकांचे पाण्याविना मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.एकीकडे विधानसभा निवडणुकीची पडघम वाजत असतानाच इच्छुक नेत्याकडून जोरदार तयारी सुरू आहे.दुसरीकडे जत पूर्व भागातील नागरिकांचा पाणी हा कळीचा मुद्दा इच्छुक नेत्यांना दिसत नाही,हे दुर्दैव म्हणावे लागेल.देशाला स्वांतंत्र्य मिळाल्यापासून जत तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन प्रत्येक नेत्याकडून दिले जात आहे.
मात्र देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटून गेली तरी ही आम्हाला पाणी द्या,असे म्हणण्याची वेळ जत तालुक्यातील नागरिकांवर कायम आहे.दरवर्षी निसर्गाचा प्रकोप जत तालुक्यावर निश्चित असतो.सर्वाधिक पाणीटंचाईचा फटका जत पूर्व भागाला बसत आहे.फेब्रुवारी,मार्च, एप्रिल, मे ते अगदी जून जुलैपर्यंत पाणीटंचाईचा सामना निश्चित असतो.जत पूर्व भागासाठी पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणारा नेता यंदा विधानसभेत पाठवावा लागेल अन्यथा पाण्यासाठीचे हाल पुढेही कायम राहणार आहेत.तीव्र जनरेट्यामुळे जत पूर्व भागासाठी सुरू करण्यात आलेल्या म्हैसाळ विस्तारित सिंचन योजना गतीने करून या भागाला पाणी देणे करून देणे क्रमप्राप्त झाले आहे.यापुढे पाऊस पडण्याची वाट बघण्यापेक्षा थेट कृष्णामाईचे महापुरातील पाणी या भागााला म्हैसाळसह या विस्तारित योजनेतून सोडले तरच या भागाचा पाणी प्रश्न सुटू कायमस्वरूपी सुटणार आहे.
त्याचबरोबर महापुराच्या काळात या योजनेतून पाणी उचलल्याने सांगली मिरजसह नदीकाटावरील लोकांना महापुरापासून मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासनावरचा महापूर,दुष्काळ ताण व यावर होणारा खर्च टाळण्यासाठी पाणी योजना प्रभावीपणे कार्यरत ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहेत.यासाठी राज्यासह जिल्हा,तालुक्यातील राजकीय इच्छाशक्ती महत्वपूर्ण ठरणार आहे.
येत्या विधानसभेला पुन्हा पाणी ठरणार मुद्दा
येत्या दोन-तीन महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीतही तालुक्याचा सिंचनासह पिण्याचा पाणीप्रश्न प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे.कर्नाटक,कृष्णेतून कोठूनही आम्हाला पाणी द्या,अशी मागणी सर्वाधिक दुष्काळाची झळ बसत असलेल्या जत पुर्व भागातील नागरिकांनी केली आहे.
जत : ऐन पावसाळ्यातही जत पुर्व भागातील अनेक गावांना पाणी पुरवठा टँकरने करावा लागत आहे.